
फोंडा: फोंड्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे अनेकांनी आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
रवी नाईक यांना फोंड्याचे ‘शिल्पकार’ म्हणून संबोधले जायचे. फोंड्याचा आतापर्यंत जो काही विकास झाला आहे, तो रवींच्या कारकिर्दीतच झाला आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. त्यात परत रवी सर्वमान्य नेते होते. त्यांना पर्याय सापडणे कठीणच असे सगळीकडे बोलले जात आहे. त्यांच्यासारखा नेता फोंड्यात सोडा गोव्यातही सापडणे कठीण, असे अनेकांचे म्हणणे आहे.
१९८४ पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत फोंडा (Ponda) मतदारसंघावर रवींचेच वर्चस्व अधोरेखित होत होते. त्यामुळेच रवींना जाऊन आठ दिवस झाले तरी फोंडावासीय शोकात असल्यासारखे वाटत आहे. दिवाळीतही हेच चित्र दिसत होते. या पार्श्वभूमीवर मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पोटनिवडणुकीची उमेदवारी भाजपने रवी पुत्र रितेश यांना द्यावी, असे तर माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी रितेशना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहन केले आहे. भंडारी समाजानेही भाजपने रितेशना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
भाजपने (BJP) अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरविण्याचे संकेत दिले असून त्याप्रमाणे तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिषी यांनीही उमेदवार रिंगणात उतरविण्याचे सुतोवाच केले आहे. काही इच्छुकही चाचपणी करायला लागले आहेत.
अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे आता फोंड्याचे मतदार कोणता कौल देतात ते बघावे लागेल. त्याचप्रमाणे सत्तेवर असलेला भाजप यातून काय मार्ग काढतो यावरही लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीत सध्या तरी चित्र अस्पष्ट दिसत असून २६ ऑक्टोबरला रवींचे बारा दिवस झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकेल, असे जाणकारांचे मत आहे.
मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी दीपक ढवळीकरांनी रितेश नाईक यांना भाजपने उमेदवारी द्यावी. मगो त्यांना पाठिंबा देईल, असे जे वक्तत्व केले आहे त्यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. रवींचे सुतक संपल्यानंतरच यावर आपण बोलेन, असे ते म्हणाले. भाटीकर हे फोंड्यात मगोचा चेहरा म्हणून काम करत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
रवी नाईक यांचे दुसरे पुत्र रॉय हेही सध्या फोंड्याचे नगरसेवक आहेत. भंडारी समाजाचे काही नेते भाजपच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव सुचवत असल्याची माहिती मिळाली आहे. आता या उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत की नाहीत, हे अजून कळले नसले तरी काही नेते त्यांच्यावर डाव खेळत आहेत, एवढे खरे!
सध्या फोंड्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपले वर्चस्व निर्माण करू पाहणारे फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी हेही या मुद्यावर ‘सायलंट’ असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.