Yuri Alemao About Cash For Job Scam
पणजी: एका पोलिस शिपायास आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पैशांच्या बदल्यात सरकारी नोकरी देण्याच्या प्रकरणात आत्महत्त्या केलेल्या घटनांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. त्याचबरोबर ''कॅश फॉर जॉब’ची सीबीआयकरवी वा न्यायालयीन सखोल चौकशी करून राज्य सरकारने त्यात गुंतलेल्या एजंटांच्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
पोलिस शिपाई प्रथमेश गावडे याच्या आत्महत्येशी संबंधित दोन निलंबित महिला शिपाई कोलवाळ कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर आलेमाव यांनी प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ते पुढे म्हणाले की, आत्महत्येस प्रवृत्त करणे ही गंभीर बाब आहे.
‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यात एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. कशामुळे या कर्मचाऱ्यास हे कठोर पाऊल उचलावे लागले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. राज्यातील पोलिस दबावाखाली येण्याची शक्यता असल्याने नोकरी घोटाळ्याचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे किंवा न्यायालयीन चौकशी करावी, असे आलेमाव यांनी नमूद केले.
माशेल येथील पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी काही जण आले असता, त्यांना मदत करण्याऐवजी एक पोलिस अधिकारी आरोपीच्या गाडीत बसला होता, अशी माहिती मिळाली आहे. अशा प्रकारांमुळे आरोपींना सुरक्षा दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगून ते म्हणाले की, हा राज्यातील मोठा नोकरी घोटाळा असल्याचे दिसत असून, यामध्ये आरोपींनी लोकांची फसवणूक करून कोट्यवधीची संपत्ती जमा केली आहे. एक गोष्ट समजून घ्यायला हवी की लोकांनी त्यांना पैसे दिले कारण पूर्वी त्यांनी सरकारी नोकऱ्या दिल्या असाव्यात, त्यामुळे या संपूर्ण टोळीमागील सूत्रधार कोण आहे, हे पुढे यावे अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.