खरी कुजबुज: राजभवनावर युरी हजर

Khari Kujbuj Political Satire: गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांच्‍या पत्‍नीने सुभाष यांच्‍या विरोधात सांगेत निवडणूक लढविली हाेती
Khari Kujbuj Political Satire: गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांच्‍या पत्‍नीने सुभाष यांच्‍या विरोधात सांगेत निवडणूक लढविली हाेती
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

राजभवनावर युरी हजर

काल गोवा विधानसभा संकुलात कॉंग्रेसने मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांना घेराव घालण्याचे जाहीर केल्यानंतर सरकारने मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अमरनाथ पणजीकर, सुनील कवठणकर, साईश आरोसकर, तुलीयो डिसोजा एवढेच नव्हे तर पार्वती नागवेकर, पेलाजीया रापोस या महिलांनी गेट व बॅरीकेड तोडून आता जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांना लाठ्या उगाराव्या लागल्या. यावेळी थोडी धक्काबुक्की झाल्याने कॉंग्रेसवाल्यांना दुखापतही झाली. परंतु, सदर आंदोलनावेळी दुपारपर्यंत विधानसभा संकुलात हजर असलेले विरोधी पक्षनेते युरीबाब सहभागी झाले नव्हते. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर ‘खरी कुजबूज’ही छापून आली. आता याचाच परिणाम म्‍हणून की काय माहीत नाही, काल राजभवनावर राज्यपालांना भेटण्यास गेलेल्‍या काँग्रेस शिष्‍टमंडळाबरोबर युरीबाब गेले होतेे. आता आंदोलनाच्‍यावेळी युरी पोलिसांना घाबरुन आले नाहीत की, अन्‍य काही कारणांमुळे ते कळले नाही. पण ते आले नाहीत, म्‍हणून काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र नाउमेद झाले. हे मात्र नक्‍की. ∙∙∙

सुभाष यांचा अनुल्‍लेखाद्वारे टोला

कुणाचीही अवहेलना करायची असेल तर अनुल्‍लेखाचे अस्‍त्र उगारावे, असे सांगण्‍यात येते. काल केपे येथील माटोळी बाजाराचे उद्‍घाटन करताना समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही तसेच केले. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांच्‍या पत्‍नीने सुभाष यांच्‍या विरोधात सांगेत निवडणूक लढविली हाेती. त्‍याचा सुभाषरावांना आलेला राग अजूनही कायम असावा. याचे कारण म्‍हणजे, या माटोळी बाजाराचे उद्‍घाटन करताना सुभाषरावांनी जिल्‍हा पंचायत अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीच्‍या विषयाला हात घालून जिल्‍हा पंचायतीच्‍या नव्‍या अध्‍यक्षा संजना वेळीप यांना काहीजण आपण निवडून आणले असे सांगतात. जर त्‍यांना दुसऱ्यांना निवडून आणता येते, तर त्‍यांना स्‍वत: निवडून कसे येता आले नाही, असा सवाल त्‍यांनी केला. बाबू कवळेकरांचे नाव न घेताही त्‍यांनी त्‍यांच्‍या दिशेने आपला तीर असा अचूक मारलाच. ∙∙∙

मराठीबाबत सुदिनरावांचे वक्तव्य

राज्यात मराठी आणि कोकणी भाषेवरून एवढा वादविवाद झाला, पण मगो नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर वगळता इतर राजकारण्यांनी तोंड उघडले नाही. सुदिन ढवळीकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषा गोमंतकीयांसाठी प्रिय असून त्यातील साहित्य वाढवण्याची आवश्‍यकता असल्याचे व्यक्त केले. त्यातच ज्या दामोदर मावजो यांनी या वादाला सुरवात केली, त्यांच्याबद्दल बोलताना सुदिन ढवळीकर यांनी मावजो यांचे कदाचित प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले असावे, असा कयास व्यक्त केला होता, जो खरा ठरला. एरव्ही एखाद्या वादावर आपल्या तोंडाची ‘खाज’ भागवणाऱ्या या इतर राजकारण्यांकडून मात्र मराठी - कोकणी वादावर चकार शब्द आला नाही, हेच मोठे आश्‍चर्य.∙∙

कुत्राही गेला, ‘ते’ मात्र लटकले

पिटबूल जातीच्या कुत्र्याने गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलाचे लचके तोडून जीव घेतला होता. या कुत्र्यानेही नुकताच जगाचा निरोप घेतला. या कुत्र्याच्या शवचिकित्सा अहवालातून शरीरात अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. मुक्या जीवाचा अर्थात कुत्र्याचा किंवा त्या निष्पाप मुलाचा दुर्दैवी अंत कुणाचेही हृदय पिळवटल्याविना रहात नाही. या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जीवानिशी गेला, त्यानंतर कुत्राही गेला अन् त्याच्या पश्‍चात आता त्याला पाळणारा मालक अन् देखभाल करणारे मात्र चौकशीच्या घेऱ्यात अडकले आहेत.∙∙∙

असंही समाधान...

मागील काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता. आता ऐन गणेशोत्सव काळात रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. त्यामुळे किमान पुढील काही दिवस खड्ड्यांचा लोकांना त्रास होणार नाही. त्यामुळे बाप्पाच पावले असे लोक म्हणत आहेत. कारण इतके दिवस खराब रस्त्यांकडे सरकारचे लक्ष जात नव्हते, आता किमान गणेश चतुर्थीनिमित्त प्रशासनाला खडबडून जाग आली म्हणायची. त्यातल्या त्यात काही राजकीय नेतेदेखील स्वखर्चाने खड्डे बुजवत आहेत, त्यामुळे किमान गणेशोत्सव सुखात जाईल, असे लोक बोलू लागलेत. ∙∙∙

कचरा नको; मग प्रकल्प कुठे करायचा?

प्रकल्प नको, पण कचरा मात्र हटला पाहिजे,असा आग्रह धरण्याची जणू फॅशनच रूढ झालीय. कुडचिरेवासीयांनी गेल्या आठवड्यात कचरा व्यवस्थापन प्रकल्प कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही,असे ठणकावून सांगितले. त्या पाठोपाठ आता वेर्णा औद्योगिक वसाहतीतही कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, असा दावा करून प्रकल्पाला विरोध करणारे पुढे आले. कोणत्याही गावात जा, कचरा प्रकल्प नकोचा नारा, ऐकायला मिळतो. परिसरात कचरा दिसला, ते चित्र ओंगळवाणे वाटत असल्याचा सूर आळवत गावकरी पंचायतींकडे नाराजी नोंदवतात. पण त्याच कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एखादा प्रकल्प अगदी हक्काच्या सरकारी जागेत उभारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला विरोध होतो. नुकतीच मुख्यमंत्र्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. ∙∙∙

‘रेंट - ए - कार’चा उद्रेक सुरूच!

राज्यात रेंट - ए - कारचा उद्रेक सुरूच असून दर दिवशी एक प्रकरण कानी ऐकू येते. पर्यटकांना वाहने दिली जातात, अन् ते अंदाधुंद ती चालवतात. यासाठी आता वाहन कायद्यात दुरुस्ती करून कार मालकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत असताना दिसते. ‘नो एंट्री’ मध्ये वाहन घेऊन घुसणे, अतिवेगाने वाहन चालवणे, सर्व नियमांची पायमल्ली केली जाते. या सगळ्यांतून गोमंतकीय त्रस्त झाले आहेत. ‘रेंट - ए - कार’चा आणि बाईकच्या उद्‍भवणाऱ्या समस्येवर काहीतरी उपाय सरकारने करावा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात दिल्या जात आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांच्‍या पत्‍नीने सुभाष यांच्‍या विरोधात सांगेत निवडणूक लढविली हाेती
खरी कुजबुज: वीज नसताना चतुर्थीची तयारी कशी करणार?

शिक्षणात राजकारण नको !

कुंभारजुवा गावातील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली केल्याचा विषय आझाद मैदानपर्यंत येऊन पोहोचला. विद्यार्थी आणि पालक आम्हाला मुख्याध्यापिकेची बदली रोखण्याची मागणी करणारे लक्षणीय आंदोलन केले. यावरून मुख्यमंत्र्यांनी शिक्षणात राजकारण करणे चूक असून ते करू नये, असे विधान केले. परंतु बदलीचे कारण आमदारांनी सांगितले म्हणून दिले गेल्याचे आरोप झाल्यानंतर हे मुख्यमंत्र्यांचे विधान लागू होते. शिक्षकांची बदली, ही त्यांच्या कामावरून झाली पाहिजे. एखादा शिक्षक योग्यरित्या आपले काम करत नसेल, तर शिक्षण खात्याने ताकीद द्यावी किंवा बदली करावी. यात राजकारण्यांनी हस्तक्षेप करणे योग्य नाही. घडल्या प्रकारावरून लोकांची शिक्षकदिनी सोशल मीडियावर चर्चा रंगली. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com