Morjim Tourism: प्रत्येक व्यक्तीला त्याच्या निर्वाहासाठी अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची गरज असते परंतु मोरजीत पर्यटनाच्या नावाखाली दिल्ली, आंध्रप्रदेश तसेच इतर भागातील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी करत आहेत.
आज गावातील 85 टक्के जमीन त्यांच्याकडे असून गावकऱ्यांकडे केवळ 15 टक्के जमीन राहिली आहे, अशा अवस्थेत आम्ही भविष्यात जगणार कसे ? या टोळधाडीमुळे आमचे गावपणच नेस्तनाबूत होण्याची भीती आहे,असे मत युवा शेतकरी मयूर शेटगावकर यांनी व्यक्त केले.
ते ‘गोमन्तक टिव्ही’वील ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. या चर्चेत ॲड. प्रसाद शहापूरकर यांनी सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना शहापूरकर म्हणाले, पेडणे तालुक्यात विकासाच्या नावाखाली जो हैदोस घातला जातोय.
आमचे समुद्र किनारे, डोंगर काबीज केले जात असून त्यांना कोणाची भीतीच राहिलेली नाही. पुढील चार पाच वर्षात मोरजीतील गावकऱ्यांना गावाबाहेर जावे लागेल, आज आमच्या गावची ग्रामसंस्कृती धोक्यात आली आहे,असेही त्यांनी सांगितले.
आम्ही मोरजीतील जैवविविधता, पर्यावरण, ग्रामसंस्कृती, कृषी वाचविण्यासाठी मारलेल्या हाकेला आता मोरजीवासीयांनी प्रामुख्याने युवा पिढी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. गाव वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे असल्याचे सर्वांना कळून चुकले आहे. बाहेरील जे गुंतवणूकदार येताहेत ते आपल्या भल्यासाठी नाहीत, ही जाणीव झाली असल्याचे शेटगावकर म्हणाले.
गावचा पंचायतीवर वचकच नाही!
मोरजीतील नागरिक ग्रामसभेत आपल्या समस्यांबाबत तसेच गावच्या विकासाच्या अनुषंगाने अनेक मते मांडतात. पंरतु त्यावर अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्षात कृती केली जात नाही. पंचायत राज कायद्याने ग्रामपंचायतीला अनेक अधिकार दिले आहेत.
ग्रामस्थांच्या इच्छेविरूद्ध कोणतीच घटना गावात घडू शकत नाहीत.पण दुदैवाने गावचा वचकही पंचायतीवर नसल्याने ते न जुमानता परवानग्या देत सुटले असल्याचे ॲड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.
ग्रामस्थांनाच विचारूनच ठरवा !
गावात कोणत्या गोष्टी असाव्यात, या ग्रामस्थांना विचारून ठरविणे गरजेचे आहे. गावच्या नियोजनाचे अधिकार सरकारला नव्हे तर ग्रामस्थांना मिळायला हवेत. गावातील घरे, शेती, जैविविधता सांभाळण्यासाठी ते गरजेचे आहे. नगर नियोजन खात्याद्वारे कार्यालयात बसून आराखडे तयार करण्यापेक्षा गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गावाच्या लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मयूर शेटगावकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.