Goa Football Association : आश्वासक युवा फुटबॉलपटू मेस्सी कुलासोचा ‘जीएफए’कडून गौरव

13 वर्षांखालील वयोगटात सर्वोत्तम खेळाडू
Messi Colaco
Messi ColacoDainik Gomantak
Published on
Updated on

प्रतिभाशाली युवा फुटबॉलपटू मेस्सी कुलासो याची गतमोसमात 13 वर्षांखालील गटातील कामगिरी राज्यात उल्लेखनीय ठरली. त्यामुळे गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात तो या वयोगटातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरला. शिवाय नवी मुंबई येथे झालेल्या रिलायन्स फाऊंडेशन यूथ चँप्सच्या चाचणीत निवड होण्याइतपत प्रगती साधली.

आक्रमक मध्यरक्षक असलेल्या मेस्सी कुलासोने 2022-23 मोसमात राज्यस्तरीय 13 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत सर्वाधिक 15 गोल नोंदवून 13 वर्षीय फुटबॉलपटूने जीएफए अध्यक्ष कायतना फर्नांडिस यांच्या हस्ते सर्वोत्तम खेळाडूचा किताब स्वीकारला.

मे महिन्यात नवी मुंबई येथे झालेल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अकादमीसाठी मेस्सीने चाचणी दिली व देशातील साठ खेळाडूंतून त्याची निवड झाली. या अकादमीतील सरावात त्याला परदेशी, तसेच देशातील निपुण प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Messi Colaco
Bhavani Devi Fencing: भवानी देवीनं चीनमध्ये रचला इतिहास! 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच भारतीय तलवारबाज

श्रेय पालक, प्रशिक्षकांना

सासष्टी तालुक्यातील नुवे येथील इगोर्जभाट येथील मेस्सी त्याच गावातील माय दोस पोब्रेस हायस्कूलमध्ये शिकतो. 2021-22 मध्ये तो शालेय पातळीवर सर्वोत्तम क्रीडापटू ठरला. मेस्सीला फुटबॉलचे बाळकडू घरीच मिळाले.

त्याचे वडील रेमी कुलासो हे राज्यातील साळगावकर एफसी, वास्को स्पोर्टस क्लब या प्रमुख संघांतर्फे फुटबॉल खेळले आहेत. ते सध्या गोवा क्रीडा प्राधिकरणाचे फुटबॉल प्रशिक्षक आहेत. हायस्कूलचे शारीरिक शिक्षण शिक्षक चंद्रेश नाईक यांचेही मेस्सीला प्रोत्साहन लाभले.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मेस्सीने वयाच्या पाचव्या वर्षापासून फुटबॉल खेळण्यास सुरवात केली. ‘‘वडील रेमी व आई क्लारा कुलासो यांचा मला भरपूर पाठिंबा आणि प्रोत्साहन लाभले. त्यामुळेच मी जोमाने फुटबॉल खेळू शकलो.

Messi Colaco
Mahanand Naik Goa: 16 महिलांची हत्या करणारा ‘दुपट्टा किलर’, गोव्यातला Serial Killer जो एका कॉलमुळे जाळ्यात अडकला

एफसी गोवाचे ज्येष्ठ मार्गदर्शक डेरिक परेरा, तसेच शेन, प्रिम्सन, कबीर, अँड्र्यू या प्रशिक्षकांना मी विसरू शकत नाही. सराव सत्रातील त्यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले,’’ असे मेस्सीने सांगितले.

देशाकडून खेळण्याचे स्वप्न

लहान वयातच देशाकडून फुटबॉल खेळण्याचे स्वप्न मेस्सी कुलासोने पाहिले आहे, ते ध्येय बाळगून तो मैदानावर मेहनत घेत आहे. ‘‘मला एक चांगला फुटबॉलपटू बनायचे आहे. एफसी गोवा, मुंबई सिटी एफसीसारख्या मोठ्या क्लबकडून खेळायचे आहे आणि हो, मला देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे, तेच माझे मोठे स्वप्न आहे,’’ असे मेस्सी म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com