New Year Celebration : थर्टी फर्स्टच्या पार्टीला फाटा; गोव्यात साहित्यिकांचं अनोखं सेलिब्रेशन

कोकण मराठी परिषद गोवा यांनी एका अनोख्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.
New Year Celebration
New Year CelebrationDainik Gomantak

आसावरी कुलकर्णी

गोवा म्हणजे सी सन अँड सँड, फुल टू धमाल असेच काहीसे चित्र जगभरात आहे. त्यामुळे दारू पिऊन, अमली पदार्थ सेवन करून धिंगाणा घालणे या एका उद्देशाने जगभरातले तसेच स्थानिक पर्यटक गोव्यात येतात. त्यात 31 डिसेंबर म्हणजे धुमच असते पार्टीची. वर्षाच्या अखेरच्या दिवशी झिंगून नववर्षाचे स्वागत किनाऱ्यावर लोळत करावे हा आजकालचा नियम झाला आहे. याच कल्पनेला फाटा देत कोकण मराठी परिषद गोवा यांनी एका अनोख्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.

साहित्यिकांनी साहित्य दीप पेटवून नवीन वर्षाचे स्वागत केले. संमेलनात जमलेल्या सर्व साहित्यिकांनी ठीक 12 वाजता पणत्या पेटवून विजयदुर्गा देवीच्या प्रांगणात दिवे लावले. तमाचा होउदे पराजय, प्रकाशाची दिसू दे वाट, आपण साहित्यकांनी ज्ञानदीप लावत राहू शब्दांचे, आणि अज्ञान अंधार दूर सारू असा संकल्प यावेळी केला. यानंतर दुग्धप्राशनही करण्यात आले. लोक गोव्यात सूर मारून झिंगत झिंगत नववर्षाचे स्वागत करतात, पण इथे मात्र सकारात्मक असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि इतर मान्यवर यांनी कौतुक केले.

कोकण मराठी परिषद आणि श्री विजयादेवी संस्थान केरी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वे शेकोटी साहित्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाचे उद्घाटक गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी हे तर अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख हे होते.

New Year Celebration
Mahadayi River: आपल्याला जगवणाऱ्या म्हादईची गोष्ट !

संमेलनाची सुरुवात जी ए कुलकर्णी यांच्या साहित्यावर आधारित परिसंवादाने झाली. यांनंतर कार्यक्रमाचे यथासांग उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक केळीच्या बुंध्याच्या दीपस्तंभावर दिवे पेटवून हे उद्घाटन करण्यात आले. पाच लेखकांच्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटक अंबादास जोशी यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि लिहिणाऱ्या हातांचा योग्य सन्मान व्हायला हवा असं स्पष्ट केलं.

संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मिकांत देशमुख म्हणाले की धार्मिक, भाषिक आणि प्रांतिक वाद जास्त गडद होत चालले आहेत, त्यामुळे लेखकांनी ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे त्यामुळे सडेतोड लिहिणे ही काळाची गरज आहे असं ते म्हणाले. यानंतर युवा सृजन हा कार्यक्रम सादर झाला. गीतगायन, नृत्य, नाट्यछटा, कविता वाचन आणि चित्रकला अश्या विविध कलारंगांनी हा कर्यक्रम रंगून गेला. त्यांनतर दिवे लावून नववर्षाचे स्वागत झाले.

New Year Celebration
Goa Accident : आमोणा जंक्शनजवळ केमिकलच्या टँकरचा अपघात; चालक गंभीर जखमी

दुसऱ्या दिवशी सकाळी रम्य अशा तळ्याच्या काठी चाफा कवीसंमेलन रंगले. संमेलनाध्यक्षांनी दिलेल्या जग उद्याचे कसे असेल या विषयावर कविता सादर करण्यात आल्या. यानंतर आजच्या यक्षप्रश्नाना तोंड देण्यास आपण दक्ष आहोत का? या विषयावर परिसंवाद झाला. अॅड. नरेंद्र सावईकर, मच्छिंद्र चारी, प्रकाश पायगुडे, सुरेश नाईक इत्यादी वक्त्यांनी आपले विचार मांडले.

मिळून साऱ्याजणी या खास महिलांच्या कार्यक्रमात गोमंतकीय स्त्रीजीवनातील लोकसाहित्यावर आधारित तुझ्या अंगणात सये हा कार्यक्रम सादर करण्यात आला. समारोपाच्या कार्यक्रमात दोन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख तसेच अंबादास जोशी यांनी एकूण संमेलनाच्या संकल्पनेचे आणि आयोजनाचे कौतुक केले. माजी केंद्रीय मंत्री श्री रमाकांत खलप यांनी म्हादई नदीवर आलेल्या संकटाविषयी चिंता व्यक्त केली. सर्व स्तरावरून याचा विरोध झाला पाहिजे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या शेवटी निमंत्रितांचे कवी संमेलन झाले.

दोन दिवसांच्या या संमेलनाचे उपस्थित साहित्यप्रेमींनी भरभरून कौतुक केले. विजयादेवी मंदिराच्या रमणीय परिसरात सम्पन्न झालेल्या या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com