फोंडा : आपल्या विचारांवर निष्ठा आणि कर्तृत्वावर विश्वास असेल, तरच उत्कृष्ट लेखक घडू शकतो. लोकांचे विचार नंतर, प्रथम आपल्या अंतर्मनाची ओळख लेखकाला व्हायला हवी, असे उद्गार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध साहित्यिक दामोदर मावजो यांनी काढले.
फोंड्यातील राजदीप गॅलेरियामधील बांबोळकर आर्ट गॅलरीमध्ये आज (बुधवारी) आयोजित कार्यक्रमात युवा लेखिका संपदा कुंकळकर यांच्या ‘जीवन योग'' या पुस्तकाचे प्रकाशन दामोदर मावजो यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक देविदास कदम, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीधर कामत बांबोळकर आणि लेखिका संपदा कुंकळकर उपस्थित होत्या.
दामोदर मावजो म्हणाले, लेखकाला नेहमीच चांगल्या आणि वाईटाची जाणीव असायला हवी. लेखकाने आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांप्रती सजगता बाळगायला हवी. अंधविश्वास पूर्णपणे काढून टाकून वास्तवाचे भान लेखकाच्या मनात असायला हवे. लेखकासाठी अनुभव फार महत्त्वाचा असून भाषेवर प्रभुत्व असेल तर एक उत्कृष्ट लेखक घडू शकतो. कदम म्हणाले, विचारांची बैठक जर मजबूत असेल तर साहित्य निर्मितीही तेवढीच सकस होते. स्वागत ज्योती कुंकळकर यांनी केले.
वास्तवाला भिडा
लेखिका संपदा कुंकळ्येकर यांनी साहित्यिक दामोदर मावजो आपले आदर्श असल्याचे सांगून वास्तववादी लिखाणावर आपला भर असल्याचे नमूद केले. आपल्याला जे पटते ते आपण स्वीकारते असे सांगून वास्तवाशी भिडण्याची ताकद लेखकाने ठेवायला हवी, असे संपदा कुंकळ्येकर म्हणाल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.