Goa Forward Party: हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ चार दिवसांवर आणल्याप्रकरणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी 25 दिवसांवरून 10 दिवसांवर आणला, आता हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ केवळ चार दिवसांवर आणला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोणाला भीत आहेत, त्यांना विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करेल याची भीती वाटते का, असा सवाल सरदेसाई यांनी केला.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला. मागील अधिवेशनातही पंधरा विरोधी आमदार होते, पण त्यावेळी विरोधी पक्षनेते सरकारलाच मिळाल्याने सरकारचे फावले होते. तरीही आम्ही आमच्या बाजूने सरकारला जाब विचारण्याचे काम केले.
आम्ही जे काही प्रश्न उपस्थित करतो, ते पूर्णपणे माहिती घेऊनच विचारलेले असतात. आम्ही 21 विषयांवर माहिती अधिकाराखाली माहिती मागितली आहे. त्यामुळे हे प्रश्न विचारले जातील, याची भीती सरकारला वाटत असावी, असे सरदेसाई म्हणाले.
16 ते 19 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात पहिला दिवस राज्यपालांच्या भाषणाचा असेल. म्हणजे उर्वरित तीन दिवस विधानसभा कामकाज चालेल. खरे तर मागील पावसाळी अधिवेशनातील 15 दिवसही या अधिवेशनात जोडायला हवे होते, पण कोण करणार? या अधिवेशनात आम्ही म्हादईप्रकरणी सरकारची भूमिका काय?
रेल्वे दुहेरी मार्ग जमिनी अधिगृहीत न करता केलेल्या कामाविषयी, ध्वनी-हवा प्रदूषणाविषयी, राज्यात डान्स बार कोणाच्या आशीर्वादाने सुरू, वेदांता कंपनीला खाण ब्लॉक देताना कोणी सेटिंग केले, खाण महामंडळाची स्थापना का नाही, इफ्फीसाठी कला अकादमी खुली होणार असे सांगत होतात, तर सध्याची स्थिती काय?
साळ नदीचे पुनरुज्जीवन करण्याबाबत स्थिती काय? खाण व्यवसायात स्थानिक युवकांना घेण्यासाठी अटी घातल्यात का? अमलीपदार्थ विक्रीत हैदराबाद पोलिस गोव्यात गुन्हेगारांना अटक करतात, तर येथील पोलिस काय करतात?
निती आयोगाने उघड केलेला बेरोजगारीची प्रश्न, राज्य सरकारचा शपथविधीपासून सुरू असलेला इव्हेंन्ट मॅनेजमेंट कार्यक्रमात झालेला खर्च, सरकार सर्व ॲप आणणार असेल तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार? जेटी व्यवस्थापनात कॅप्टन ऑफ पोर्ट्सची भूमिका काय? कला अकादमी, रवींद्र भवन बंद असल्याने तियात्र सादरीकरणावर आलेले संकट, फातोर्डा येथील जलतरण तलावाची स्थिती, मोपा व दाबोळी विमानतळाविषयी प्रश्न?
असे महत्त्वाचे प्रश्न आम्ही उपस्थित करणार आहोत. हे सर्व प्रश्न आम्हाला मांडता आले नाहीत, तरी विरोधी आमदारांच्या माध्यमातून ते कसे उपस्थित करता येतील हे पाहिले जाईल, असेही सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.