Bardez News : बार्देश तालुका काँग्रेसच्या हातातून निसटतोय? पक्षसंघटना विस्कळीत

Bardez News : श्रीपादभाऊंच्या विजयात तालुक्यातील मताधिक्य ठरले महत्त्वाचे
Bardez
BardezDainik Gomantak

Bardez News :

म्हापसा, उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपने लोकसभेत श्रीपाद नाईक यांच्या रूपात सहाव्यांदा घवघवीत सरशी घेतली. भाऊंच्या विजयात बार्देश तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. दुसरीकडे, या तालुक्यातील काँग्रेसची पकड कमकुवत होत चालली आहे, असे आकडेवारीतून स्पष्ट होते.

सक्रिय कार्यकर्ते ते नेतेमंडळींचा अभाव, दुर्बल संघटनेपासून नावालाच असलेल्या गट समित्यांच्या कामगिरीकडे पक्षाने वेळीच हस्तक्षेप करून त्यास बळकटी न दिल्यास तालुक्यातील काँग्रेसच्या पक्षसंघटनेची विस्कटलेली घडी प्रसंगी जास्त बिघडेल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

या लोकसभेत भाजपला तालुक्यातून २०,९१७ एवढे मताधिक्य मिळाले. भाजपला ७५,२८५ तर काँग्रेसला ५७,१९५ मते पडली. २०१९मध्ये भाजपला ७४,०८४ मते मिळाली होती तर काँग्रेसला ६३,१३१ मते. यंदा हळदोणेमधून काँग्रेसला नाममात्र ८० मतांची आघाडी मिळाली. जी काँग्रेससाठी धोक्याची सूचना मानली जात आहे. सध्या सात मतदारसंघांपैकी केवळ हळदोणे हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. तर उर्वरित सहा मतदारसंघांचे नेतृत्व हे भाजप आमदार करत आहेत.

Bardez
Goa Loksabha Election Result: भाजपला आघाडी, तरीही विजय दुरापास्त; मुरगावातील मतदानात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा वरचष्मा

हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा हे इंडिया आघाडीचे उत्तर गोवा समन्वयक होते. त्यामुळे पक्षाचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांना उत्तरेतील सर्व वीस मतदारसंघांत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. तसेच आपल्या होमग्राउंड म्हणजे हळदोणेमधून मोठी आघाडी मिळवून देण्याचे उत्तरदायित्व फेरेरांवर होते. यात फेरेरा किंचित मागे राहिले. तर माजी आमदार ग्लेन टिकलो हे गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून कमबॅकच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाऊंच्या प्रचारात टिकलोंनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांची कामगिरी ही दखल घेण्यासारखी राहिली.

टिकलोंनी घरोघरी प्रचारापासून मतदारांच्या गाठीभेटीस प्राधान्य दिले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांचीही साथ मिळाली. आगामी २०२७च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फेरेरा यांनी काँग्रेसला मिळवून दिलेली ही लोकसभेची नाममात्र ८० मतांची आघाडी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी धोक्याची ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत बनले आहे.

म्हापसा, शिवोली, साळगाव, पर्वरीत आघाडी

मागील तीन लोकसभा निवडणुकीचे आकडेवारी पाहता, बार्देश तालुक्याचे झुकते माप हे भाजपच्या बाजूने असल्याचे दिसते. यावेळी हळदोणे व कळंगुट हे दोन मतदारसंघ सोडल्यास म्हापसा, शिवोली, थिवी, साळगाव व पर्वरीत भाजपला लक्षवेधी आघाडी मिळाली.

म्हापशातून भाजपला ४,१६० मताधिक्य मिळाले. २०१९मध्ये हे मताधिक्य ३,४४१ इतके होते. पर्वरीतून गेल्या लोकसभेत ३,९२३ मताधिक्य मिळाले तर यावेळी ५,७०५ इतके मताधिक्य मिळाले. तसेच साळगावमधून २,४८४ मतांची आघाडी या लोकसभेत ३,४९५ मतांवर पोहोचली.

तसेच शिवोलीत २०१९मध्ये ५९८ मताधिक्य होते, ते यावेळी २,६३१ मतांवर पोहोचले. थिवीतून भाजपच्या मताधिक्यामध्ये दुप्पट वाढ झाली. २०१९मध्ये २,४२५ मताधिक्य मिळालेले, तेथे यावेळी ४,९२६ मतांची आघाडी मिळाली.

लोबो फॅक्टर फक्त विधानसभेत...

मागील तीन लोकसभेची कळंगुटमधील आकडेवारी पाहता, आमदार मायकल लोबो फॅक्टर हा केवळ विधानसभेपुरता चालतो, असे अधोरेखित होते. कळंगुटमधून भाजपला २०१४पासून आघाडी घेता आलेली नाही. २०१४मध्ये काँग्रेसला ११५ मतांची आघाडी मिळाली. तर २०१९मध्ये काँग्रेसला २,४५८ मताधिक्य व आता २०२४मध्ये २,१५७ इतके मताधिक्य पुन्हा मिळाले. त्यामुळे लोबोंचा मतदारांसोबत असलेला थेट संपर्क लोकसभेत भाजपसाठी फायदेशीर ठरू शकला नाही.

‘आरजी’चे अस्तित्व जाणवतेय

‘आरजी’ने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविली. मनोज परब हे ‘आरजी’चे उमेदवार होते. गेल्या विधानसभेत ‘आरजी’ने पर्वरी व हळदोणेत उमेदवार उभा केला नव्हता. परंतु, लोकसभेच्या अनुषंगाने ‘आरजी’ला हळदोणेत १,४७२ मते, पर्वरीत ८३४ मते आणि शिवोलीतून ३,५८५ मते पडली. गेल्या विधानसभेत शिवोलीत त्यांना ३,१८८ मते मिळाली होती. याचाच अर्थ शिवोलीत ‘आरजी’ने पकड मिळविल्याचे हे संकेत आहेत. ‘आरजी’ला बार्देशातून एकूण १३,८०९ मते पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com