Russians In Goa: जास्त खर्च करणारे रशियन गोव्याऐवजी दुबईला जाण्यास का पसंती देत आहेत? या मागील कारणांचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
गोवा अजूनही आंतरराष्ट्रीय पर्यटकांबाबतीत रशिया आणि ब्रिटनवर अवलंबून आहे. याशिवाय यूएसए, यूएई, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान या सारख्या उदयोन्मुख बाजारपेठांकडे देखील लक्ष दिले पाहिजे. असे रोहन खंवटे म्हणाले.
"जास्त खर्च करणारे रशियन पर्यटक दुबईला जात आहेत. रशियन पर्यटक अलिकडे गोव्यात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याच्या कारणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. नेमके काय चुकले ज्यामुळे पर्यटकांनी गोव्याऐवजी दुबईला जाण्यास पसंती देत आहेत, हे जाणून घ्यायला हवे." असे रोहन खंवटे म्हणाले.
सौदी अरेबिया नवीन पर्यटन सेवा आणि विविध प्रकारचे प्रकल्प सुरू करून विकसित होत आहे. गोव्याने त्याचे अनुकरण केले पाहिजे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने राज्यात पर्यटक वाढविण्याची संधी आहे. असे खंवटे म्हणाले.
विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नवीन विमानतळाला आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची मागणी करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे या पलीकडे आम्ही चर्चा करायला सुरुवात केली आहे. आम्हाला प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल, अर्थव्यवस्था वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल. यासाठी प्रयत्न करायला हवेत. असे खंवटे म्हणाले.
पर्यटक संख्येच्या बाबतीत राज्याने प्रमाणापेक्षा गुणवत्तेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. केरळची यशोगाथा पाहून गोव्याने शिकायला पाहिजे. असे खंवटे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.