अबब! किती महागडी पाण्याची बॉटल...खरी कुजबुज

850 रुपये किमतीला एक साधी पाण्याची बॉटल, हे जरा अतीच: रवी नाईक
खरी कुजबुज
खरी कुजबुजDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे किती महागड्या किमतीचे पाणी पीत असतील? गोव्याचे मंत्री रवी नाईक यांनी त्याबाबतीत काही माहिती जाहीर केली आहे. रवी नाईक यांच्या मते, अमित शहा गोव्यात आले होते, तेव्हा त्यांच्यासाठी हिमालयाची 850 रुपये किमतीची बॉटल विकत घ्यावी लागली होती. रवी नाईक यांना पाण्यासंदर्भात काहीतरी भाष्य करायचे होते. त्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिले. कोणत्या कंपनीची बॉटल 850 रुपये किमतीला मिळते, हे गोवेकरांना तरी आज पहिल्यांदा समजले. रवी नाईक म्हणतात त्यानुसार, पिण्याचे पाणी तयार करण्यासाठी आता राज्याला काही भरीव उपाय योजावे लागणार आहेत. वास्तविक, सरकारला करता येण्यासारखे खूप काही आहे. परंतु नेतेच जर 850 रुपयांच्या पाण्याच्या बाटल्या पिऊ लागले, तर ती बातमी निश्‍चितच होणार. देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. परंतु 850 रुपये किमतीला एक साधी पाण्याची बॉटल? हे जरा अतीच झाले. ∙∙∙

आताही मधाचेच बोट

निवडणूक काळात जिथे जाईल त्या मतदारसंघात विजयी आमदाराला मंत्रिपद देण्याची घोषणा मुख्यमंत्री करीत होते. त्यापैकी काही पराभूत झाले, तर काही निवडून आलेसुद्धा. पण त्या घोषणा निवडणूक काळात मतदारांना भुलविण्यासाठी असतात हे आता जनतेला कळून आले आहे. आता परत राज्यात आयआयटी प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर असल्याने मुख्यमंत्री जिथे जातील तिथे आयआयटी सुरू करण्याचे मधाचे बोट प्रत्येक आमदारांच्या तोंडात घालू लागले आहेत. काणकोण मतदारसंघात गेले असता काणकोणवासीयांना खूष केले. मध्येच केपेत आयआयटी सुरू करण्यासाठी आजी माजी आमदार मागणी करीत असताना सांगेत जाऊन मुख्यमंत्री सांगेला प्राधान्य देण्याचे मधाचे बोट सांगेवासीयांच्या तोंडात घालून मुख्यमंत्री कोणता खेळ खेळत आहेत हे मात्र लोकांना कळायला मार्ग नाही.

बाबूंचे इव्हेंट्स मॅनेजमेंट

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या वाढदिवसाच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण त्यांनी त्यासाठी केलेले नियोजन. या वाढदिवसासाठी बाबू कवळेकर यांनी वातावरण निर्मिती करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या व्हाट्सॲप ग्रुपवर ‘हॅपी बर्थडे सर’ असा आयकॉन घालायला लावला होता आणि त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना म्हणे तो फोटो त्यांच्या फेसबुकवर टाकण्याची विनंतीही केली होती. या वाढदिवस समारंभात कार्यकर्त्यांची गर्दी दिसावी यासाठी सर्वांना आग्रहाने आमंत्रण तर दिले होतेच, शिवाय एकाच वेळी गर्दी दिसावी यासाठी संपूर्ण दिवसभर कार्यक्रम न ठेवता. सायंकाळी ६ ते ९ पर्यंत हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या या समारंभाला बरीच गर्दी दिसली. असे करताना बाबू कवळेकर यांनी आपण इव्हेंट्स मॅनेजमेंटमध्ये निपुण कसे तेही दाखवून दिले. ∙∙∙

नीलेश काब्राल शिर्डीला!

मडगाव पालिकेत सत्ता बदल होण्याची चाहुल असताना मडगावच्या काही नगरसेवकांचा गट शिर्डीला साईबाबांच्या चरणाकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेल्याच्या पार्श्वभूमीवर मडगावात उलटसुलट चर्चा चालू असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल हेही शिर्डीला दाखल झाले अशी बातमी त्यांच्या फोटोसह गोव्यात येऊन थडकली. आता कुडचडेत किंवा गोव्यात राजकीय उलथापालथ होण्याची काही शक्यता नाही अशा परिस्थितीत काब्रालही शिर्डीला साईबाबांच्या पायापाशी कशाला गेले हाच प्रश्न सध्या येथे चर्चेत आहे. ∙∙∙

आमदारकी ‘पार्ट टाईम’ नव्हे

विधिकारांना म्हणजे आमदारांना 365 दिवस म्हणजे वर्षभर काम सक्तीचे असल्याचे भाष्य सभापती रमेश तवडकर यांनी केले आहे त्यामुळे सरसकट सर्वच आमदार अस्वस्थ झाले असावेत. कारण तसे झाले, तर त्यांना अन्य कामांसाठी वेळ मिळणार नाही. हल्लीच्या काळात भल्या सकाळीच आमदारांच्या घराकडे लोकांची गर्दी उसळत असते व सभापती म्हणतात तसे झाले, तर रात्रीही ही गर्दी होईल अशी भीती त्यांना वाटते. यावर आणखी एकाने केलेले भाष्य वस्तुस्थितीदर्शक होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या आमदारांना घसघशीत मानधन व अन्य सर्व सुविधा मिळतात त्या बदल्यात त्यांनी ल़ोकांसाठी 365 दिवस दिले काम केले, तर बिघडले कुठे? ∙∙∙

कीर्ती आझाद उवाच....

विधानसभा निवडणूक काळात तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेल्या अनेक हौशा, नवशा आणि गौशांनी आता तृणमूलला रामराम ठोकला आहे. सद्यस्‍थितीत या पक्षात केवळ लुईझिन फालेरोच तृणमूलमध्ये राहिले असावेत. प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनीही नुकताच राजीनामा दिला. गोव्‍यात काहीही शिल्लक राहिले नसताना पक्षाचे नेते तथा माजी क्रिकेटर किर्ती आझाद यांनी मात्र दुर्दम्‍य आशावाद व्‍यक्‍त केला. तृणमूल काँग्रेस निवडणुकीपुरता नव्,‍हे तर कायमचा आला असल्‍याचे त्‍यांनी विधान केले. तृणमूलच्‍या जाहिरातींचा धडाका आणि पैशांचा पाऊस पाहून अनेकजण या पक्षात सामील झाले.

‘गोव्‍याची नवी सकाळ’ म्‍हणून अनेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या तृणमूलला प्रत्‍यक्षात सव्वापाच टक्‍के मते पडली. त्‍यांचा दारुण पराभव झाला. तरीही इतर पक्षांची जुनी आकडेवारी देत आझाद यांनी गोव्‍यात यशस्‍वी होऊ, असा आशावाद व्‍यक्‍त केला. माणसाने आशावादी असायला हवे यात दुमत नाही, पण जुनी आकडेवारी पाहून खूष होण्यातही अर्थ नाही. आझाद यांनी जुनी आकडेवारी छान लक्षात ठेवली, पण ‘अजीब है गोवा के लोग’ हे पंडित नेहरूंचे विधान विसरून गेले... ∙∙∙

फोंड्यातील ‘भूमिगत वीजवाहिन्या’

फोंडा शहरात 22 कोटी खर्च करून ‘भूमिगत वीजवाहिन्या’ घातल्या जातील असे फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले होते, पण या वीजवाहिन्यांशी संबंधित असलेले वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी अशाप्रकारच्या वीजवाहिन्या पुढील पाच ते दहा वर्षांत घालता येणार नाहीत असे सांगून रवींच्या या घोषणेतील हवाच काढून घेतली. वास्तविक रवी हे ‘विकास पुरुष’ म्हणून ओळखले जातात. त्यांचे व्हीजन चांगले असल्यामुळे फोंड्याला एक सुबक स्वरूप प्राप्त झाले आहे हे कोणच नाकारू शकत नाही, पण त्यावेळी रवी बोलेल ते होत होते.

रवी गृहमंत्री असताना त्यांनी फोंड्यात अनेक प्रकल्प आणले त्यावेळी त्यांना ना म्हणण्याची ताकद कोणताच नव्हती. आणि खरे तर या भूमीगत वीजवाहिन्या म्हणजे काळाची गरज आहे हे कोणीही मान्य करेल. त्यामुळे सध्या जी वीज खंडित होते तिला आळा बसू शकतो, पण आता वीजमंत्र्यानीच या भूमिगत वाहिन्या फार खर्चिक असल्यामुळे त्या लगेच टाकणे शक्य होणार नाही असे सांगितल्यामुळे फोंड्याला पुढील दहा वर्षे तरी या वाहिन्या दिसणार नाहीत असेच म्हणावे लागेल. यातून रवी व सुदिनांची ‘खुन्नस’ दिसून येतेच. पण त्याचबरोबर एकेकाळी फोंड्याचे सर्वेसर्वा असलेल्या रवींना आपले व्हिजन अंमलात आणण्याकरिता आता दुसऱ्या मंत्र्यावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे सूचित होत आहे. फोंड्यात सध्या याच गोष्टीची चर्चा सुरू आहे. ‘कालाय तस्मै नमः’ म्हणतात ते हेच नव्हे ना असे लोकांना वाटायला लागले आहे हे खरे.

काणकोणच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे काणकोण, सांगे, मेळावली येथे फिरवून पुन्हा काणकोणात स्थिरस्थावर होण्याचे मनसुबे असतानाच आयआयटी सांगेमध्ये होणार हे संकेत मुख्यमंत्र्यांनी देऊन काणकोणमधील कोमुनिदाद भागधारकांमधील हवाच काढून घेतली आहे. काणकोणला शैक्षणिक हब बनविण्यात येणार असल्याचे जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या संकल्पपूर्ती महामेळाव्यात केले होते.

कदाचित महाराष्ट्रातील संजय घोडावत सारख्या खासगी विद्यापीठाची स्थापना करून काणकोण शैक्षणिक हब बनविण्याची त्यांची इच्छा असावी. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव करताना त्यांना भवानी तलवार देऊन गौरव केला. त्या तलवारीचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच सर्व धर्मियांच्या उद्धारासाठी त्यांनी करावा अशी चर्चा त्यांच्या वक्तव्यानंतर काणकोणात सुरू झाली आहे. ∙∙∙

काँग्रेसचे खरे रूप कोणते?

रेल्वे दुपदरीकरणाला दिला गेलेला वन्य जीवन मंडळाचा परवाना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने रेल्वेचा हा प्रकल्प गोत्यात आला आहे. पण मुद्दा तो नाही. या नव्या घडामोडीनंतर सरसकट सर्वच काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया बोलक्या ठरल्या आहेत. वास्तविक रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा हा प्रस्ताव रेल्वेने केंद्रात काँग्रेस राजवट असतानाच तयार केला होता, पण नंतर सत्तापालट झाला व काँग्रेसचे प्राधान्यक्रम बदलले. असाच काहीसा प्रकार कोकण रेल्वेवेळीही घडला होता. त्यामुळे काँग्रेस पक्ष रेल्वेविरोधक असा शिक्का त्याच्या कपाळी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती काही काँग्रेसवालेच व्यक्त करू लागले आहेत. ∙∙∙

खाण माफिया निश्चिंत?

गोवा सरकारने जरी 88 खाण लीजधारकांवर त्वरित खाणींवरील ताबा सोडून एका महिन्याच्या आत त्या मोकळ्या करण्याच्या नोटिसा बजावलेल्या असल्या, तरी प्रत्यक्षात लीजधारक निश्चिंत तर आहेतच, पण त्यांनी ती बाब अजूनही विशेष गांभिर्याने घेतलेली नाही. सत्ताधाऱ्यांशी त्यांचे असलेले मेथकूट हे त्यामागील कारण असल्याचे जसे सांगितले जात आहे, त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला आपणाशी पंगा घेण्याची हिंमत होणार नाही असे त्यांना वाटते. त्यामुळे नोटिसा जारी करण्यापलीकडे आणखी काही करण्याची हिंमत सरकारकडे नाही याची त्यांना खात्री आहे. ∙∙∙

सरपंच बाईचे मिस्टर लागले कामाला!

घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही असे म्हणतात ते खरे. जून महिन्यात पंचायत निवडणुका होण्याची शक्यता असल्याने पंच व सरपंच होण्यास इच्छुक असलेले आतापासूनच कामाला लागले आहेत. सध्या महिला पंच व महिला सरपंचाचे पतीदेव पत्नीची ड्युटी करण्यात व्यस्त आहेत. सासष्टीत महिला पंच व महिला सरपंचांचे मिस्टर सध्या आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी बेकायदेशीर घरांना घर नंबर देण्याच्या कामात व्यस्त आहेत. खास करून ज्या बिगर गोमतकीयांनी कोमुनिदादच्या जमिनीवर बेकायदेशीर घरे उभारली आहेत त्यांना भूमिपुत्र बनविण्यासाठी सरपंच मॅडमचे मिस्टर फायली घेऊन फिरताना दिसतात. निवडणूक जिंकायची म्हटल्यावर साम, दाम, दंड भेद नीती वापरावीच लागणार नाही का? ∙∙∙

खरी कुजबुज
मी यापुढे निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही: राजेंद्र आर्लेकर

त्यांची विदेशवारी कर्मचाऱ्यांची मात्र गोची!

आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना ही म्हण कदंब महामंडळाला लागू पडते. आताच सुत्रे स्वीकारलेले महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर कदंबची गाडी रुळावर आणण्यासाठी झटत आहेत. मात्र, महामंडळाचे काही कोडगे अधिकारी व काही मुजोर कर्मचारी आपली मनमानी चालवितात. बिचारे उल्हास मात्र सगळे उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. महामंडळाचे ज्येष्ठ अधिकारी म्हणे महामंडळाच्या पैशांवर विदेशवारीवर गेले होते. आता हे अधिकारी काय शिकायला गेले होते ते तेच जाणो. मात्र, या अधिकाऱ्याचे विदेशवारीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सही करण्यास योग्य अधिकारी नसल्याने वेतन मिळण्यास विलंब झाला. म्हणतात ना कुणाच्या म्हशी व कोण काढतो उठाबशी अशातला हा प्रकार. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com