मागील वर्षी कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मोठा वाद झाला होता. पंचायतीने पुतळा हटविण्याचे आदेश मागे घेतल्यानंतर या वादावर पडदा पडला होता.
त्यानंतर आता महाराजांच्या पुतळ्यावरुन आणखी एक वाद समोर आला असून, पाद्रीभाट सां जुझे दी अरीयाल येथे पुतळा उभारण्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
भाजप नेते सावियो रॉड्रिग्स यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. "पाद्रीभाट सां जुझे दी अरीयाल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले. वाद जास्त वाढल्यानंतर पंचायत सदस्यांनी यात मध्यस्थी करण्यासाठी बोलवले. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक पारवानगी असेल तर काहीच समस्या नाही. पण, परवानगी नसेल तर तुम्हाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे," असे सावियो रॉड्रिग्स यांनी गावकऱ्यांना समजावले.
ख्रिस्ती गावात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी आणि घोषणा चालू देणार नाही. आमच्या गावात क्रॉस आहेत, असा प्रश्न एका गावकऱ्याने उपस्थित केला. भारतीय इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान तुम्हाला माहिती नाही, हा धार्मिक नव्हे राष्ट्रीयत्वाचा मुद्दा अशी मी त्यांची समजूत काढली, पण परिस्थिती अद्याप तणावपूर्ण असल्याचे सावियो यांनी सांगितले.
मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या त्याग आणि समर्पणाचा भारतीय कॅथलिक नागरिक म्हणून अभिमान आहे. पण, काहीजण छत्रपतींच्या बलिदानाला जातीय राजकारणाचा मुद्दा बनवत आहेत. शिवाजी महाराज हे कट्टर राष्ट्रवादी होते. भारतमातेसाठी त्यांनी दाखवलेल्या अपार शौर्य आणि भक्तीपासून प्रत्येक भारतीयाने प्रेरणा घेतली पाहिजे, असे सावियो रॉड्रिग्स म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.