Bird Migration: पक्षी जाय दिगंतरा! गोव्यातील स्थलांतरित पक्षी आणि त्यांचे अधिवास; विशेष लेख

Goa Bird Migration: पक्ष्यांचे स्थलांतर ही दरवर्षी नियमितपणे घडणारी एक विलक्षण घटना आहे. अनेक शतकांपासून होत आली आहे.
Goa Bird Migration
Goa Bird MigrationDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. संगीता साेनक

काही वर्षांपूर्वी सांतिनेज खाडीच्या कडेकडेने चालताना कितीतरी पक्षी दिसायचे. काही खाडीच्या काठावर असलेल्या झाडांवरील फळे खायला यायचे, तर काही खाडीतल्या पाण्यातील मासळी. पाण्यात पांढरे बगळे खूप दिसायचे. दिवसा पाण्यातील मासळी पकडायचे आणि रात्री तेथील झाडांवर झोपायचे. पाणकावळे झाडांवर आपले ओले पंख पसरवून बसलेले दिसायचे. त्यांना पाण्यात डुबकी घेऊन मासे पकडताना बघणे आनंददायक दृश्य होते.

धीवरही (kingfisher) असेच झाडांवर टपून बसायचे, पाण्यात मासळी दिसली की डुबकी घ्यायचे आणि तोंडात मासा पकडूनच वर यायचे. सामान्य धीवर, बलाकचोच धीवर, पांढऱ्या छातीचा धीवर, कवड्या (pied) धीवर. धीवरच किती विविध प्रकारचे दिसायचे तेथे. कधीकधी तर एकाच वेळी दोन-तीन कवड्या धीवर दिसायचे. पिवळेधम्मक हळद्याही (golden oriole) वसंताची चाहूल लागली की सक्रिय व्हायचे.

खाडीच्या काठावर असलेल्या खरगोळच्या (चारकोल ट्रीच्या) फांद्यांवर त्यांना बागडताना बघितले की मन आनंदी व्हायचे. खरगोळच्या फांद्यांवर पुष्कळ पक्षी विसावलेले दिसायचे. या झाडांवरील फळे अनेक पक्ष्यांना आकर्षित करायची. जुलै-ऑगस्टमध्ये या झाडांवर हरोळी (pompadour pigeon) यायचे.

चिमण्या, कोकिळा, सुतारपक्षी, दोन-तीन प्रकारचे पोपट, बुलबूल, शिंजीर, दयाळ, भारद्वाज, पाणकोंबड्या, कमळपक्षी (jacanas), असे कितीतरी पक्षी या खाडीच्या काठावर दिसायचे. काही पक्षी वर्षातील बाराही महिने दिसायचे तर काही ठरावीक काळात. येथील झाडी आता हळूहळू कमी झाली आहे.

काठावर अनेक घरे आली आहेत. केवळ येथीलच नाही तर जवळपास असलेल्या अनेक घरातील कचरा येथे टाकला जात आहे. म्हणून खाडीला उकिरड्याचे स्वरूप येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी सांडपाणीही खाडीच्या पाण्यात मोकळे केले जात आहे. त्यामुळे एकेकाळी खळखळ वाहणारी ही खाडी बुजत आहे. हा कचरा आणि सांडपाणी खाडीच्या र्‍हासाचे प्रमुख कारण आहे.

करमळीची तळी तर स्थलांतर करण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांसाठी नंदनवनच होती. या तलावातील पाण्यात तरंगणारी अनेक प्रकारची बदके आणि जांभळ्या पाणकोंबड्या पक्षिप्रेमींसाठी एक पर्वणीच असायची. तलावाच्या काठावर असलेली झाडी कित्येक पक्ष्यांना, स्थलांतरित आणि स्थानिक, सुरक्षित आश्रयस्थान होते. कांस्यपंखी व लांब शेपटीचे, दोन्ही प्रकारचे कमळपक्षी येथे निवास करायचे.

हे पाणपक्षी इथून तिथे करताना कॅमेऱ्याने टिपणारे निसर्गप्रेमी येथे सतत दिसायचे. सदाबहार असलेला हा तलाव विविध पक्ष्यांनी भरलेला असायचा. पर्यटकांनी भरलेल्या गोव्यात या तलावाजवळ थोडा एकांतवास लाभायचा. दर वर्षी सरासरी ३५,००० ते ७५,००० पक्षी येथे आढळत होते असे पक्षितज्ज्ञांचे मत आहे. जलचरांची विविधता आणि विपुलता, दोन्ही दृष्टींनी, हा तलाव सजलेला असायचा.

चोडणाला नदीच्या काठावर असलेल्या सलीम अली पक्षी अभयारण्यातील खारफुटीत विविध पक्षी आसरा घ्यायचे. कंठेरी धीवर आणि काळ्या टोपीचा धीवर येथील खास आकर्षणांपैकी होते. क्षत्रबलाक, छोटे आणि मोठे, येथे खात्रीने दिसायचे. भरतीच्या वेळी नावेतून नागमोडी वळणे घेत मांडवी नदीतून फिरत येथील निसर्गाचा आस्वाद आम्ही मनमुराद घेतलेला आहे. ओहोटीच्या वेळी वेगवेगळे पक्षी पाहत या खारफुटींचा आनंदही आम्ही अनेक वेळा चाखलेला आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे येणाऱ्या या हिवाळी पाहुण्यांनी आमच्यासारख्या पुष्कळांना आपल्या दर्शनाने नेत्रसुख दिले आहे.

कुडतरीच्या नंदा तलावातही पुष्कळ पक्षी दिसायचे. या तलावाला २०२२मध्ये ‘रामसर स्थळ’ घोषित करण्यात आले आहे. हे स्थळ अधिकृतरीत्या घोषित केलेले गोव्यातील एकमेव रामसर स्थळ आहे. अनेक स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास येथे आहे. येथील जैवविविधता विपुल आहे. अशीच विविधता गोव्यातील इतरही काही पाणथळ जमिनीत दिसायची. ताळगावच्या शेतात हिवाळ्यात अनेक पक्षी दिसायचे. क्षत्रबलाक, चित्रबलाक, करकोचे, शराटी हे पाहुणे हमखास दर्शन द्यायचे. गोव्यातील खाजन जमिनीतही अनेक पक्ष्यांचा आढळ होता.

दीर्घ पल्ल्याचे उड्डाण करून गोव्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा निवास असलेली ही गोव्यातील काही पाणथळ स्थळे. पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय महत्त्व असलेली. काही वर्षांपूर्वी ही स्थळे पक्ष्यांच्या अधिवासांनी गजबजलेली होती. पण आजकाल यांना अवकळा आलेली दिसत आहे. पर्यटकांसारखे पूर्वी ज्या प्रमाणात येथे पक्षी दिसायचे ते प्रमाण आता कमी झाले आहे.

पक्ष्यांचे स्थलांतर ही दरवर्षी नियमितपणे घडणारी एक विलक्षण घटना आहे. अनेक शतकांपासून होत आली आहे. तीन हजार वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीक लेखक होमर तसेच नंतर अ‍ॅरिस्टॉटल यांनी काही पक्ष्यांच्या स्थलांतराची नोंद केली आहे. निसर्गतज्ज्ञ व संशोधक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट् यांनीही पक्ष्यांचे निरीक्षण करून आपली गृहीतके मांडलेली आहेत. ठरावीक काळात, ठरावीक मार्गाने उड्डाण करून विशिष्ट काळासाठी पक्षी स्थलांतर करतात.

Goa Bird Migration
Shakespeare: मॅक्बॅथमधून अवतरतोय गोमंतकिय मुकभट

सूर्य, ताऱ्यांची दिशा आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र त्यांना मार्गदर्शन करतात असे पक्षिशास्त्रज्ञांचे मानणे आहे. अन्नाची मुबलकता, ऋतुमानानुसार होणारे हवामानातील बदल आणि प्रजनन या कारणांसाठी पक्षी स्थलांतर करत असावेत असे शास्त्रज्ञ मानतात.

बहुतेक पक्षी पाणथळ प्रदेशात स्थलांतर करतात. केवळ पक्ष्यांसाठी नाही तर या पाणथळ परिसंस्थांचे महत्त्व पर्यावरण तसेच मानवी जीवन आणि मानवकल्याणासाठीही फार मोलाचे आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या पाणथळ परिसंस्था मानवालाही उपयुक्त आहेत, मोलाच्या आहेत. सेंद्रिय पदार्थांनी संपन्न असल्यामुळे या परिसंस्था सजीवांच्या अनेक प्रजातींच्या आश्रयदात्या आहेत. काही प्रजाती केवळ आर्द्र भूमीतच आढळतात. कित्येक जलचर, मासे, पशुपक्षी यांच्यासाठी या निवासस्थान, प्रजननस्थान आणि पोषणस्थान आहेत.

Goa Bird Migration
Goa State Bird: गोव्याचा राज्यपक्षी तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या खासितयत

पूरनियंत्रण, जमीनक्षरणप्रतिबंध, भूजलपुनर्भरण, प्रदूषणरोधक अशी अनेक कामे या परिसंस्था करतात. शिवाय सांस्कृतिकदृष्ट्या तसेच नयनरम्य अशा निसर्गसौंदर्याने मानवी जीवन सुखदायक बनवतात. परिसराचे सौंदर्यात्मक मूल्य वाढवून आपल्या मनोहर सृष्टिसौंदर्याने या परिसंस्था मानसिक संतोष देतात. दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जगभर अनेक जण पाणथळभूमींचे संरक्षण आणि संवर्धन करायची शपथ घेतात. यावर्षी २ फेब्रुवारीला आपणही आपल्याकडून होईल तेवढे या पाणथळ जमिनींचे संवर्धन करायचा, निदान तसा प्रयत्न करायचा, संकल्प करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com