Shakespeare: मॅक्बॅथमधून अवतरतोय गोमंतकिय मुकभट

शेक्सपियरच्या मॅक्बॅथ या नाटकातील नागमोडी मानवी वळणे ‘मुकभट’ या आपल्या नाटकामधून, गोमंतकीय व्यक्तिरेखांमार्फत नाट्यदिग्दर्शक केतन जाधव सादर करत आहे.
Drama
Drama Dainik Gomantak
Published on
Updated on

Shakespeare: साडेचारशे वर्षांपूर्वीचा शेक्सपियर अजूनही नाट्यकलाकारांना आवाहन करत असतो. मानवी अंतरातल्या उलाढाली तो इतक्या परिणामकपणे मांडतो की समकालीन समाजातील माणसांमध्येही त्याच्या नाटकातील व्यक्तिरेखांची प्रतिबिंबे उभी-आडवी सुळकांडून जाताना दिसतात.

अशाच काही प्रतिबिंबांना आपल्या नाटकामध्ये उभे करण्याचा प्रयत्न नाट्यदिग्दर्शक केतन जाधव करू पाहतो. शेक्सपियरच्या मॅक्बॅथ या नाटकातील नागमोडी मानवी वळणे ‘मुकभट’ या आपल्या नाटकामधून, गोमंतकीय व्यक्तिरेखांमार्फत तो सादर करतो आहे.

10 सप्टेंबर 2022 रोजी केतन जाधन याने दिग्दर्शित केलेल्या शेक्सपिअरच्या मॅक्बॅथवर आधारलेल्या ‘मुकभट’ या नाटकाचा प्रयोग  सायंकाळी 6.30 वाजता, फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरच्या ‘एरिना थिएटर’ मध्ये होणार आहे.

हा प्रयोग सशुल्क असला तरी त्याचे स्वरुप  व्यावसायिक नाही. सुमारे 70 प्रेक्षकांच्या आसनाची व्‍यवस्था  असलेल्या या जागेत होणाऱ्या या प्रयोगाची तिकिटविक्री त्यांना अधिकाधिक प्रयोग करायला सहाय्य मात्र नक्कीच करेल. अशा प्रयोगशीलतेचे स्वागत आपण अवश्‍य करायला हवे.

  •   मॅक्‍बॅथ का?

केतन: मी जिथे राहतो त्या समाजाचे चित्र आणि मॅक्बॅथ यात मला अनेक साम्ये दिसतात. जादूटोणा, अनिश्‍चितता, भ्रष्टाचार, हव्यास, क्रुर राजकारण, जात-धर्म आणि आधुनिक जगाच्या अनुषंगाने बदलणारे राजकारण इत्यादी.

  •   मॅक्बॅथच्या गोष्टीला तुम्ही समकालीन रुप कसे दिले?

केतन : ज्या गोष्टी मला घाबरवतात आणि माझ्या उबदार जागेतून मला हाकलण्याचा प्रयत्न करतात त्यांचे आव्हान स्वीकारणे मला आवडते.

एक दिग्‍दर्शक म्हणून शेक्सपियरच्या नाटकाचे रुपांतर करताना मी नक्कीच नर्व्हस होतो पण मॅकबॅथमधल्या जातीय, लैंगिक राजकारणाला दृश्‍य रुप देणे आणि ते विस्तृत कथानकाचा भाग बनणे हे वेधक आणि आकर्षक होते.

मला ‘नाटका’ची मजबूत पार्श्‍वभूमी आहे आणि मॅक्बॅथचा आशयही माझ्या परिचयाचा आहे. शिवाय मॅक्बॅथवर आधारलेला माझ्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्या अभिनेत्यांनीही आपले योगदान दिले आहे.

या संहितेमधली ‘महत्त्वाकांक्षा’, सत्ता या घटकापेक्षा दुःखाच्या तीव्र भावनेने ज्या प्रकारे आकाराला येते ते मला भावले. मला ते खुप फ्रेश वाटले. युद्‍ध, राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, व्यक्तिवाद, लैंगिक ओळख, भेदभाव, सेन्सरशीप, वांशिक आणि धार्मिक असहिष्णूता या कोळीष्टकांत आपण आजही जगतो आहोत नाही का?

शेक्सपियरने त्या काळात ओळखलेल्या सांस्कृतिक भेदांच्या समस्या आज माझ्यासमोर आहेत- त्याची नाटके माझ्यासारख्यांना नेहमीच आमंत्रीत करत राहतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘मुकभट’ ला समकालीन बनवण्यासाठी मी फारसे काही केलेले नाही. शेक्सपियरच्या लेखणीत ते सर्व काही आहे. मी फक्त गोमंतकीय बाटलीत जुनीच दारू भरली आहे

  • ह्या नाटकावर तू कधीपासून काम करतो आहेस?

केतन: लॉकडाऊनच्या काळापासून मी त्यावर काम करतो आहे. 2021 मध्ये मी स्वतः मॅक्बेथची भूमिका केली आहे. त्यामुळे त्या नाटकाचा माझा सखोल अभ्यास झाला आहे. 2022 मध्ये मी ते नाटक दिग्दर्शितही केले होते.

या नाटकासंदर्भात ‘थिएटर फ्लेमिंगो’ ने आयोजित केलेल्या ॲक्टर्स लॅब निवासी कार्यशाळेत भारतातील  विविध ठिकाणाहून आलेल्या लोकांसोबत मी 7 दिवस काम केले आहे. त्यानंतर मे 2023 पासून ‘मुकभट’ वर काम करण्यास सुरुवात झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com