गोव्यातील हातमाग उद्योगाला ग्लेमर कसे आणता येईल आणि या कारागिरांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ कशी मिळवून देता येईल यावर चर्चा करण्यासाठी ऊर्जा ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च अकादमी, नारी सोच आणि गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाकडून ‘बुनाई उत्सव २०२३’ या महोत्सवाचे आयाेजीन करण्यात आले आहे.
‘बुनाई उत्सव २०२३’ या महोत्सवाचे शनिवार 14 ऑक्टोबर रोजी राय येथील व्ही.एम.साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हाॅस्पिटलिटी या संस्थेच्या सभागृहात होणार असून सेलिब्रेटी अँकर रुचिका डावर या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहेत.
या महाेत्सवात हातमाग विणकारांच्या प्रश्र्नावर चर्चा करण्याबरोबरच हँडलूम वस्त्रांवर आधारित फॅशन शो होणार आहे.
पद्मीनी फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत या उपक्रमाच्या मुख्य प्रवर्तक असून दुपारी २.३० वाजल्यानंतर या उत्सवाला सुरुवात होणार आहे. लेखिका शेफाली वैद्य या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
तर समारोप सोहळ्याला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर हे उपस्थित रहाणार आहेत.
या उत्सवाबद्दल माहिती देताना उर्जा अकादमीच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत यांनी सांगितले, गोव्याची कुणबी साडी आणि हातमागावर विणलेल्या इतर वस्तू यावर या उत्सवात प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे.
या वस्त्रांना नव्या फॅशनकडे कसे जोडता येणे शक्य आहे आणि या व्यवसायात आणखी काय नाविन्य आणता येणे शक्य आहे यावर परिसंवाद होणार असून त्यानंतर हँडलूम वस्त्रधारण केलेल्या महिलांचा फॅशन शो होणार असून त्यात बारा महिला सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.