Water Tank Missing In Curti-Khandepar Ponda: मराठीत काही वर्षांपूर्वी मकरंद अनासपुरे यांनी अभिनय केलेला 'जाऊ तिथे खाऊ' नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात मकंरद अनासपुरे त्यांची न बांधलेली पण मंजूर झालेली विहीर चोरीला गेली अशी तक्रार दाखल करतात आणि त्यानंतर झालेली सगळी गंमत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
गोव्यातील एका गावात देखील पाच लाख रूपये खर्च करून पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली, त्याचे फलक देखील लागले मात्र, प्रत्यक्षात तिथे टाकीच नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे टाकी चोरीला गेली का प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
झाले असे की, पंचमी- खांडेपार येथे अमृत सरोवर योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यासाठी 4 लाख 94 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला. मंजूर प्रस्तावानुसार टाकीच्या बांधकामाला 29 जुलै 2022 मध्ये सुरूवात झाली आणि 15 ऑगस्ट 2022 मध्ये काम पूर्ण देखील झाले. म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात टाकी बांधून पूर्ण झाली.
याबाबत बांधकाम सुरू, पूर्ण, खर्च, जागा आणि गोवा सरकार फलक देखील लागला. मात्र, ज्या जागेवर टाकी बांधली असे सरकार म्हणते तिथे प्रत्यक्षात टाकीच नसल्याचा धक्कादायक आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे.
जलसंसाधन खात्याने बांधलेल्या या टाकीचे काम फक्त कागदोपत्री पूर्ण झाले असे दाखविण्यात आले असून, प्रत्यक्षात या जागेवर टाकीच नसल्याचे ग्रामस्थ तिचा शोध घेत आहेत. जलसंसाधन खात्याने अमृत सरोवर योजनेअंतर्गत 2022 साली कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रातील पंचमी येथे पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
टाकीचा पत्ता नाही मात्र काम पूर्ण झाल्याचा माहिती फलक आणि मुख्यमंत्री व जलसंसाधन मंत्र्यांचा फोटो असल्याचा फलकही येथे उभारण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी हे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा येथे ध्वजारोहन देखील आल्याचे स्थानिक सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.