Water Sports In Goa : सत्ताधारी भाजपमधील मंत्री-आमदार यांच्यातील वेबनावाची परिणिती म्हणून शुक्रवारी कळंगुट किनारपट्टीवरील जलक्रीडा व्यवसाय काही काळ बंद राहिले. जलक्रीडा बंद राहिल्याने पर्यटकांना साहसी खेळांपासून वंचित राहावे लागले, तर स्थानिक व्यावसायिकांनाही त्याची मोठी झळ बसली.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे सध्या पोर्तुगालच्या अधिकृत दाैऱ्यावर असून तेथूनच त्यांनी एका आदेशाद्वारे गोव्यातील सर्व जलक्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गोव्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी ‘जीईएल’बरोबर (गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) नोंदणी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस येथील जलक्रीडा व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
‘जीईएल’च्या नावाखाली गोव्याबाहेरच्या एका व्यावसायिकाच्या दावणीला राज्यातील जलक्रीडा व्यावसायिकांना बांधण्याचा निर्णय सरकारने एकतर्फी घेतला असून याचा निषेध म्हणून जलक्रीडा व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
या वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्सनी यासाठी कित्येक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याशी सल्लामसलत न करताच परस्पर ‘जीईएल’ नोंदणीचा निर्णय घेतल्याने त्यास व्यावसायिकांचा आक्षेप आहे.
...म्हणून पर्यटनमंत्र्यांनी व्यावसायिकांवर हाणला बडगा
कळंगुट येथील जलक्रीडा व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी आमदार मायकल लोबो, आमदार केदार नाईक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे नाराज झाले आणि त्यांनी जलक्रीडा व्यावसायिकांवरच बडगा हाणला, अशी माहिती सरकारमधील विश्वसनीय सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिली.
पर्यटनाशी संबंध नाही, तरीही ‘जीईएल’कडे नोंदणी का?
‘जीईएल’ या संस्थेचा पर्यटनाशी काहीही संबंध नाही. तरीही ‘जीईएल’कडे नोंदणी का करावी लागते, असा सवाल जलक्रीडा व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
गोव्याबाहेरील जलक्रीडा कंपनीला राज्यात आणून स्थानिक उद्योगाला संपविण्याचे पर्यटन खात्याचे कारस्थान असल्याची टीका स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे. सरकारच्या या आक्षेपार्ह निर्णयामुळे स्थानिकांवर बेरोजगारीचे संकट कोसळेल, असाही त्यांचा आरोप आहे.
पर्यटन मंत्र्यांचा मनमानी कारभार : व्यावसायिकांचा आरोप
या विषयावर जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत जलसफरी बंद ठेवण्याचा निर्णय कळंगुट येथील स्थानिक बोट संघटनेने घेतला आहे. बोटी आमच्या, व्यवसाय आमचा, कर्जही आमच्याच नावावर घेतले, तर मग ‘जीईएल’ला आम्ही कशासाठी कर द्यायचा?
प्रत्येक मंत्री आपल्या कार्यकाळात स्वत:च्या मनाप्रमाणे नवनवीन कायदे आणतो. उद्या मंत्री बदलताच नवीन कंपनी आमच्यावर नवीन कायदे लादणार नाही कशावरून? असा सवाल या संघटनेने केला आहे.
बागा येथे जलसफरी सुरू
बागा किनाऱ्यावर जलक्रीडा उपक्रम सुरू होते. आम्ही या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यानुसार आम्ही बागा किनाऱ्यावर उपक्रम सुरू ठेवले. मात्र, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, असे एका व्यावसायिकाने सांगितले.
आश्वासनाने पडदा
कळंगुटमध्ये शुक्रवारी जलक्रीडा प्रकार बंद केले, तरी दक्षिण गोव्यात ते सुरूच होते. कोलवा आणि बाणावली येथे जलसफरी सुरू होत्या.
बाणावली येथील वॉटर स्पोर्टस् ऑपरेटर पेले फर्नांडिस यांना विचारले असता, उत्तर गोव्यात क्रीडा प्रकार बंद ठेवले होते. मात्र, आमदार मायकल लोबो यांनी पर्यटन खात्याचे अधिकारी आणि पोलिसांची समजूत काढून ते परत सुरू केले.
लोबो आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, असे सांगून फर्नांडिस यांनी त्या दोघांचे आभार मानले.
"किनारी भागात स्थानिक जलक्रीडा व्यावसायिक ‘क्यू’ पद्धतीने व्यवसाय करतात. त्यात कोणताही बेकायदेशीरपणा दिसत नाही. सध्या कोठेही जलक्रीडा व्यवसाय बंद नाही."
"मात्र, शुक्रवारी कळंगुटमध्ये काही काळ तो बंद राहिला. स्थानिकांचा व्यवसाय वाचविणे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. आम्ही लोकांसोबत असून, जेव्हा हा व्यवसाय बंद करतील, तेव्हा काय करायचे ते पाहू."
- मायकल लोबो, आमदार, कळंगुट.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.