गुळेली : गुळेली परिसरातील नागरिकांना गेले दोन दिवस पाण्यावाचून दिवस काढावे लागले आहे. म्हादई नदीतील पाण्याची पातळी घटल्याने नदीवर असलेले पाण्याचे पंप सध्या पाणी खेचण्यास असमर्थ ठरल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.
म्हादई नदीवरील गांजे येथील बंधाऱ्यावर अडवलेले पाणी सध्या सोडण्यात आल्याने म्हादई नदीच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे नदी किनारी असलेले पाणी खेचण्याचे पंप ओस पडले आहेत.
म्हादई नदीवर पाडेली - गुळेली पुलालगत पाणी खेचायचा पंप आहे. या पंपाच्या साहाय्याने वर उंचावर बांधण्यात आलेल्या मोठ्या दोन टाक्यांत पाणी साठवून त्यावर प्रक्रिया करून गुळेली आदी परिसरात हे पाणी पोचवले जाते. काही वर्षांपूर्वी या भागात दैनंदिन पाण्याचा प्रश्न सतावत होता. त्यावर उपाय म्हणून आणि या भागातील जनतेच्या मागणीवरून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प उभारण्यात आला होता, परंतु सध्या पंपातून पाणी खेचणे बंद झाल्याने ही टाकी पाण्याविना आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने यावर त्वरित उपाय योजण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी काहीतरी हालचाल करून ज्या ठिकाणी पाणी आहे, त्याठिकाणी पर्यंत चर मारुन तरी पाईप आहे, त्याठिकाणापर्यंत पाणी पोचवण्यासाठी तरी प्रयत्न करायला सुरवात करावी, असे ग्रामस्थांनी सुचवले होते.
गुळेली भागात गेल्या दोन दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत होता त्या अनुषंगाने गुळेली व धामसे येथील पंच अनुक्रमे अनिल गावडे व विनोद गावकर यांनी संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून या विषयाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली. त्यास अनुसरून साबाखाच्या पाणी विभागातर्फे पावले उचलत खात्यातर्फे तीन कामगार पाठवून ज्या ठिकाणी चर खोदण्याची आवश्यकता होती तिथे चर खोदणे सुरू केले आहे. गुळेली-धामसे व कणकिरे परिसरातील भागांना गेले दोन दिवस पाण्यावाचून दिवस काढावे लागत आहेत.
पंच अनिल गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून सुद्धा काहीच साध्य झाले नाही. गुळेली ग्रामपंचायतीचे धामसेचे पंच विनोद गावकर यांनीही या संदर्भात विचारण केली असता त्यांना संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याचे गावकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.