हवामान खात्याने राज्यात मॉन्सून पोहोचल्याचे जाहीर केले असले, तरी आभाळ कोरडेच आहे. त्यातच ‘स्कायमेट’ने ६ जुलैपर्यंत मॉन्सून कमजोर असेल, अशी शक्यता वर्तवल्याने चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ‘राज्यातील धरणांत पुरेसे पाणी आहे’, असा आज दावा केला आहे.
तथापि, प्रत्यक्षात सत्तरी, पेडणे, काणकोण तालुक्यांतील अनेक गावांमध्ये अनेक दिवस नळाला पाणीच आलेले नाही. त्यामुळे या भागांसह फोंडा व धारबांदोडातील काही ठिकाणी पाण्यासाठी आक्रोश वाढला आहे. धरणांत पाणी असले तरी उपेक्षित ठिकाणी पोहोचविणार कसे, हा प्रश्न आहे. मॉन्सून अनेक अर्थांनी महत्त्वाचा असतो. राज्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या धरणांतील पाण्याचे साठेही वर्षभर पुरणारेच आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सर्व प्रकारच्या पाण्यासाठी मॉन्सूनकडेच डोळे लावावे लागतात.
यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळात आठ दिवस उशिरा दाखल झालेला मॉन्सून राज्यात अवघ्या तीन दिवसांत पोचला. मात्र, त्याची सक्रियता तितकीशी पूरक नाही. त्यामुळे राज्यात मॉन्सून येऊनही आभाळ कोरडे, अशी स्थिती आहे.
धरण साठ्यांनी गाठलेल्या तळामुळे अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. पंचवाडी धरण कोरडे पडले आहे, तर अंजुणे धरणात केवळ चार-पाच दिवस पुरेल, इतकेच पाणी आहे.
साळावली, तिळारी, आमठाणे धरणांत पुरेसे पाणी आहे. मात्र ते धरण साठ्यांच्या खाली उभारलेल्या पाणीपुरवठा योजनांशिवाय इतर ठिकाणी देण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे सत्तरी, पेडणे, काणकोण तालुक्यांतील अनेक गावांना चक्क पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सत्तरीतील अनेक गावांत तर आठ दिवस झाले, नळांना पाणी आलेच नाही. यावर आज, बुधवारी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, राज्यात ५० दिवस पुरेल इतके पाणी आहे. पण पाणी आहे म्हणून ते कसेही वापरता येणार नाही, याची जाणीव आम्हाला झाली आहे. यासाठी पाणी नियोजन, पाणी संवर्धन आणि रेन हार्वेस्टिंग करावे लागणार आहे. या लांबलेल्या पावसाने आम्हाला पाण्याचे महत्त्व शिकवले आहे आणि यापुढेही याबाबत गांभीर्याने पावले उचलावी लागतील.
96.9 मि.मी. आतापर्यंत पडलेला पाऊस
104.3 मि.मी. अपेक्षित पाऊस
7.1% एकूण तूट
123.8 मि.मी.vसर्वाधिक पाऊस केपेत
राज्यात तुरळक पावसाची शक्यता
राज्यात तुरळक पावसाची शक्यता
राज्यात मॉन्सून सुरू होऊनही सध्या तुरळक पाऊस पडत आहे. तसेच पुढील चार-पाच दिवस तुरळक पाऊस बरसण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १३.७ मि.मी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस फोंडा येथे २८ मि.मी. बरसला. त्याखालोखाल फोंडा, जुने गोवे, पणजी, मडगाव, काणकोण, सत्तरी, केपे आदी भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.
...तर जगणे मुश्कील
तांबडीसुर्ला : साबांखाची निविदा संपल्याने साकोर्डा भागात पाणी पुरवणाऱ्या टँकरचालकाने लोकांना पूर्वसूचना न देता सेवा अचानक बंद केल्याने लोकांची तारांबळ उडाली. डोंगरवाडा, मेस्तावाडा, तयडे, बोरीयाळ व धारगे या गावांत यंदा पावसाचे आगमन लांबणीवर पडल्याने लोकांना तीव्र पाणी टंचाई भासत आहे. नदी, विहिरीचे पाणी आटल्याने पाणी टंचाईत भर पडली आहे. अडीच महिन्यांपासून लोक टँकरवर अवलंबून अाहेत.
‘बिपरजॉय’साठी नौदल सज्ज
नवी दिल्ली: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि मांडवी येथील बंदरावर येऊन धडकण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून मदत साहित्यासह नौदलाच्या चार नौका तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पोरबंदर आणि ओखा या बंदरांसाठी प्रत्येकी पाच बचाव पथके तर वलसाडसाठी प्रत्येकी १४ बचाव पथके तैनात ठेवली आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.