गोव्यातील पाण्याच्या बिलांचा प्रश्न सुटता सुटेना
मडगाव : गेले दोन महिने गोव्यात पाण्याच्या वाढीव बिलांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून त्याचे निरसन अजूनही झालेले नाही. त्यामुळे गोव्यात सर्वत्र वाढीव बिलांमुळे सार्वजनिक बांधकाम खाते (पाणी विभाग) अधिकाऱ्यांवर नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देण्याची पाळी आली आहे.
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यानी पाणी बिलांबद्दल स्पष्टीकरण देताना नागरिकांना बिले न भरण्यास सांगितले होते. पाणी पुरवठा खात्यामध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडून बिलामध्ये सुधारणा करुन घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले होते. निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आणि सरकार यावर काहीही निर्णय घेऊ शकलं नव्हतं मात्र अजूनही पाण्याच्या वाढीव बिलांचा हा प्रश्न न सुटल्याने नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर यावर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान काही लोकांना परत एकदा पाण्याची बिले देण्यात आली आहेत. इतकंच नाही तर त्यात आणखी वाढही दाखवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक आणखीनच संतप्त झाले आहेत. ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं जात आहे. जोपर्यंत सरकार (Goa Government) सत्तेवर येत नाही आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री पदभार सांभाळत नाही तो पर्यंत यावर तोडगा निघण्याची शक्यता कमीच असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
दवर्ली येथील नागरिकांनी फातोर्डा (Fatorda) येथील पाणी पुरवठा खात्याचा सहाय्यक अभियंता प्रेमकांत राणे यांना घेराव घातला. यावेळी अभियंत्याने नागरिकांना बिलांची रक्कम हप्त्याने भरा, असे सुचवले, मात्र नागरिक त्यासाठी तयार झाले नाहीत.
आम्हाला वाढीव बिले का देण्यात आली याचे प्रथम स्पष्टीकरण द्या, असे नागरिकांनी सहाय्यक अभियंत्याला खडसावून सांगितले. आम्हाला बिले दर महिन्याला आणि पूर्वीप्रमाणे पाहिजेत. हप्त्याहप्त्याने भरले तरी आम्हाला पुरी रक्कम भरावी लागेल. विनाकारण ही पूर्ण रक्कम का भरावी. पाण्याच्या बिलांची रक्कम वाढली कशी याचे प्रथम स्पष्टीकरण मिळू दे, असेही नागरिकांना अधिकाऱ्यांना सुनावले आहे. तसेच पाण्याची बिले दर महिन्याला द्यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.