शापोरा किल्ल्याच्या भिंतीचे दगड कोसळू लागले आहेत. पर्यटक या भिंतीवर बसत असल्याने पर्यटक दगडासह खाली पडण्याची भीती शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी विधानसभेत शून्य तासाला व्यक्त केली.
अनेक पर्यटकांची पावले शापोरा किल्ल्याकडे वळतात. मात्र हा किल्ला आता त्यांच्यासाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. या किल्ल्याच्या भिंती आता ढासळू लागल्या आहेत. सरकारने प्राधान्याने या किल्ल्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे दिलायला लोबो म्हणाल्या.
त्यावर पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, दुरुस्तीच्या कामासाठी तीन कोटी आठ लाख रुपये खर्च येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र लिहिले आहे. या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती हाती घेतली होती.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर म्हणाले, रस्त्याशेजारी कचरा फेकण्याचे प्रमाण विशेषतः किनारी भागात वाढले आहे. यामुळे पर्यटकांना दुर्गंधीमय वातावरणात वावरावे लागते.
किनारी भागातील कचरा व्यवस्थापनाचे काम गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केला. ते म्हणाले, महामंडळ कंत्राटदार नेमेल. सध्या पंचायतींकडे ही जबाबदारी आहे. मात्र पंचायती कंत्रटदाराला अस्वच्छतेविषयी विचारणा करत नाहीत असे दिसते. त्यामुळे सर्वच किनारी भाग महामंडळाकडे सोपवून कचरा व्यवस्थापन मार्गी लावण्याचा सरकारचा विचार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.