मालपेत रेल्‍वे बोगद्याची भिंत कोसळली

pernem1.
pernem1.
Published on
Updated on

प्रकाश तळवणेकर, प्रशांत शेटये

पेडणे :

मालपे - पेडणे येथील कोकण रेल्वेच्या बोगद्याची एक भिंत काल रात्री १.४० वाजता कोसळून दगडमिश्रीत चिखल रेल्वे रुळावर आला. त्‍यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गाने येणाऱ्या सर्व रेल्वे अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. पाहणीसाठी कोकण रेल्वेच्या अभियंत्याचे एक पथक आज संध्या. ६.३० वा.च्या सुमारास बोगद्यात गेले. तर भिंत फुटून बाहेर पडलेली चिखलमिश्रीत माती काढण्यासाठी दोन जेसीबी यंत्रे आणण्यात आली. रेल्वेच्या बोगद्यातील भिंत कोसळल्याने या मार्गावरिल रेल्वे बंद करण्यात आल्याची माहिती नसलेल्या प्रवाशांना माघारी परतावे लागले.
मालपेच्या बाजूने बोगद्यात प्रवेश करताना सुमारे पन्नास मीटर अंतरावर भिंत कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचे बांधकाम केव्हा सुरू होऊन ते पूर्ण कधी होईल, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.


कोकण रेल्वेचे मुंबई ते मेंगलोर मार्गावर लहान मोठे ९२ बोगदे आहेत. अनेक तांत्रिक कारणामुळे मालपे पेडणे बोगद्याचे काम बरीच वर्षे रखडल्याने त्यावेळी हा बोगदा बराच चर्चेत आला होता. खाजने ते मालपेपर्यंत हा बोगदा १.५६ कि.मी. अंतरचा आहे. मे १९९२ मध्ये या बोगद्याच्या बांधकामाला प्रारंभ झाला. बोगद्याच्या या बांधकामाचे कंत्राट ‘निर्माण सिंधिया’ या कंपनीला मिळाले होते. नंतर बांधकाम लवकर व्हावे म्हणून खाजने बाजूने बोगद्याचे कंत्राट एन.पी.पुरुषोत्तम कंपनीला देण्यात आले होते.

भुसभुशीत माती, जलस्रोतांमुळे घटना
बोगद्याच्‍या काही ठिकाणी भुसभुशीत माती, काही ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत तर काही ठिकाणी खडकाळ तर काही ठिकाणी खडकांचे वेगवेगळे थर यामुळे बोगद्याचे काम करताना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्‍या. प्रस्तुत प्रतिनिधीने वृतांकन करण्यासाठी त्यावेळी दोनवेळा या बोगद्यात जाऊन आले होते. आत जलवाहिन्या टाकून पाणी बाहेर काढले जात आहे. तरीही बोगद्यात पाणी हे असायाचे. त्यासाठी ॲमिस्टर हे यंत्र आणले होते. पण, आत मोठे खडक, वरून टपकणारे पाणी यामुळे सतत मृत्यूची टांगती तलवार घेऊन कामगार, अभियंते वावरायचे.

बोगद्यात काही ठिकाणी गुढघाभरही पाणी साचायचे. या काळात बोगद्याचे काम सुरू असताना पहाटेच्यावेळी बोगद्यात दरड कोसळून दोन कामगार ठार झाले होते. विजेचा धक्का बसून एक युवा मजूर ठार झाला. या बोगद्याजवळ पुरलेल्या एका मृतदेहाचे अवयव कोल्ह्या कुत्र्यांनी उकरून काढल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिस ठाण्यात बोगद्याचे बांधकाम सुरू असताना फक्त सहा ते सात कामगार ठार झाल्याच्या नोंदी झाल्‍या होत्‍या.

पाण्‍याचे स्रोत दिशा बदलली
बोगद्याचा बहुतांश भाग हा पाणथळ होता. बोगद्याचे बांधकाम सुरू केल्यावर येथील पाण्याचे स्रोत हे बाजूला असलेल्या अमय वाड्यापर्यंत पोहोचले होते. पण, बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ झाल्यावर पाण्याचा प्रवाह बदलून बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने म्हणजे खाजने बाजूने गेला आणि तिथे धबधब्याचे स्वरूप आले. वास्तविक या ठिकाणी भूगर्भाची तपासणी करताना तज्‍ज्ञांचेही दुर्लक्ष झाले होते. पाण्याचे साठे असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी मुरत राहून बोगद्याची भिंत कोसळली असण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वेच्या गाड्या
मिरज - पुणे मार्गे वळवल्या
जोरदार पावसामुळे पेडणे रेल्‍वेस्‍थानकाजवळील बोगद्याची भिंत कोसळल्याने कोकण रेल्वेच्या गाड्या मडगाव, लोंढा - मिरज, पुणे, पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत. बोगद्याच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच दिवस लागणार असून तोपर्यंत या मार्गावरील रेलगाड्या मिरज- पुणेमार्गे धावतील असे कोकण रेल्वेने कळवले आहे.
या घटनेमुळे एर्नाकुलम - निजामुद्दीन, थिरुवंतपूरम - लोकमान्य टिळक टर्मिनस - मुंबई, न्यू दिल्ली - थिरुवंतपूरम केंद्रीय राजधानी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - थिरुवंतपूरम या गाड्या मिरज, पुणे मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
काल मध्‍यरात्रीनंतर ही घटना घडली. बोगद्याच्या दक्षिण बाजूने ३०० मीटर आत ५ मीटर लांबीचा भिंतीचा भाग कोसळला. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन नुकसानीचा अंदाज घेतला. दुरुस्तीसाठी चार ते पाच दिवस लागणार असून तोपर्यंत या मार्गावरच्या रेलगाड्या मिरज - पुणे मार्गे वळवण्यात येतील अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे ज्येष्ठ व्यवस्थापक बबन घाटगे यांनी दिली.
गेले चार पाच दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे ही भिंत कोसळली. कोसळलेली भिंत व मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर आला असून हा ढिगारा हटवण्याचे व कोसळलेल्या भिंतीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आल्‍याचे श्री. घाटगे यांनी सांगितले.

संपादन : महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com