तिसवाडी: धाकटेभाट डोंगरी येथे एका घराची भिंत शेजारच्या घरावर कोसळून दोन्हीही घरांचे नुकसान झाले. सदर घटना काल दुपारी २.३० वा. सुमारास घडली. संदीप नाईक यांच्या घराची ही भिंत शेजारच्या जल्मी यांच्या घरावर कोसळल्याने घरातील साहित्याची मोडतोड झाली.
घटना घडल्यानंतर संदीप नाईक यांनी आजोशी-मंडूर पंचायतीवर अटल आसरा योजनांचा अर्ज हरवल्याचा आरोप केला. त्यामुळे अद्याप अटल आसरा योजनेनुसार आर्थिक मदत मिळाली नाही.
२०२३ मध्ये आपण योजनेसाठी अर्ज केला होता, परंतु विलंब झाल्यानंतर जेव्हा चौकशी केली, तेव्हा अर्ज हरवल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर यासंबंधी दक्षता खात्यात तक्रार केली आहे, अशी माहिती संदीप नाईक यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
घडलेली घटना आणि नाईक यांनी केलेल्या आरोपासंदर्भात जेव्हा आजोशी-मंडूरचे सरपंच प्रशांत नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नाईक यांनी अर्ज सादर केला होता, परंतु तो पंचायतीकडून हरवलेला नाही तर समाज कल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सदर अर्ज पणजीतील मुख्यालयात अर्ज सादर केलाच नाही. त्याबाबत चौकशी केली, असता तो अर्ज हरवल्याचे समजले. अखेर आम्ही नाईक यांना नवीन अर्ज करण्याची सूचना केली होती. पण त्यांनी आपल्याकडे वेळ नाही, असे कारण देऊन विषय टाळला. यंदाच्या पावसामुळे घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळून दोन्ही घरांचे नुकसान झाले.
आमच्या पंचायतीत मोठ्या संख्येत अटल आसरा योजनेच्या निधीसाठी अर्ज केले आहेत, परंतु हा निधी मिळण्यात विलंब होत असल्याने लोकांची त्रास सहन करावा लागतो. सरकारने हा निधी लवकरात लवकर लोकांना द्यायला हवा. अर्थ साहाय्य मिळाले तर घरांची दुरुस्ती लवकर होईल. आमच्या परिसरात पडलेल्या घरांना आर्थिक मदत देखील लवकर द्यायला हवी, असे मत प्रशांत नाईक यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.