Bicholim: विठ्ठलापूरच्या शाळेचे वर्चस्व कायम, पटसंख्येत वाढ; इंग्रजीच्या आक्रमणानंतरही 'नंबर वन'चे स्थान अबाधित

vitthal rakhumai government primary school: श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेने यंदाही आपले वर्चस्व प्रस्थापित करताना ''नंबर वन''चे स्थान कायम राखले आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सुरुवातीपासूनच गजबजणारी आणि पटसंख्येच्या बाबतीत राज्यात आघाडीवर असलेल्या विठ्ठलापूर-कारापूर येथील श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळेने यंदाही आपले वर्चस्व प्रस्थापित करताना ''नंबर वन''चे स्थान कायम राखले आहे. चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक विभागात ८८ मिळून या शाळेत तब्बल ३०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

एकीकडे इंग्रजीचे वाढते ''फॅड'' आणि आक्रमणामुळे मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा संकटात आल्या आहेत. दरवर्षी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांवर गदा येत आहे. एकेकाळी म्हणजेच पंचवीस-तीस वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांनी गजबजणाऱ्या काही शाळा तर बंद पडल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांत तर डिचोली तालुक्यातील तब्बल १३ सरकारी प्राथमिक शाळांना ''टाळे'' ठोकण्याची वेळ आली आहे. अशा कठीण परिस्थितीत विठ्ठलापूरच्या या शाळेने मात्र पटसंख्येच्या बाबतीत आपला दबदबा कायम ठेवण्याची किमया साध्य केली आहे. या किमयामागचे सारे श्रेय सरकारसह शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना जात आहे.

पर्यावरणपूरक ''ग्रीन'' शाळा

विठ्ठल रखुमाई सरकारी शाळेला राज्यातील पहिल्या ''ग्रीन'' अर्थातच पर्यावरणपूरक शाळेचा मान प्राप्त झाला आहे. या शाळेसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत शीतल वातावरण आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळावा, अशी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

विविध प्रकारच्या रंगांनी ही इमारत रंगविण्यात आली आहे. या इमारतीत १६ वर्गखोल्या असून नृत्य, योग आणि संगीत प्रशिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळेत पाय ठेवताच मुलांना वेगळ्याच विश्वाचा अनुभव तर मिळत आहेच. उलट संस्कारक्षम शिक्षणासह मूल्यवर्धित आणि मुक्त वातावरणात ज्ञानार्जन करण्याचे भाग्य प्राप्त होत आहे.

Bicholim
Goa Drug Case: 'स्‍विगी डिलिव्हरी बॉय' निघाला ड्रग्स तस्कर, सांकवाळमध्‍ये 22 हजाराच्या गांजासह एकाला अटक

शाळेत होत आहेत सुसंस्कार

विठ्ठलापूरच्या शाळेत शिक्षकांसह पालक विद्यार्थ्यांसाठी मेहनत आणि कष्ट घेतात. ही शाळा म्हणजे एक कुटुंब असल्याची अनुभूती येते. मदतीसाठी पालक सदैव तत्पर असतातच. तसेच ''माझी शाळा'' या भावनेने माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो, असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वर्धमान शेंदुरे यांनी सांगितले.

विठ्ठल रखुमाई सरकारी शाळा हे विद्येचे पवित्र मंदिर आहे. या शाळेतून संस्कारक्षम शिक्षणाबरोबरच वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम घडवून आणले जातात. त्यामुळे पालकांना या शाळेबद्दल ओढ आहे, असे मत पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संगेश कुंडईकर आणि उपाध्यक्ष जान्हवी केळकर यांनी व्यक्त केले.

Bicholim
Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

विठ्ठलापूर शाळेचा इतिहास

डिचोली तालुक्यातील कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रातील विठ्ठलापूर येथे १९६३ साली ही मराठी माध्यमातील प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. इमारतीअभावी सुरुवातीस या शाळेचे वर्ग श्री विठ्ठल मंदिराच्या मागे असलेल्या भवानी मंदिरात घेण्यात येत होते. कालांतराने दुभाषी कुटुंबीयांच्या सहकार्यातून शाळेची इमारत बांधण्यात आली.

सुरुवातीपासूनच या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या समाधानकारक होती. या शाळेला मिळणारा प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांची संख्या याचा विचार करता, शाळेसाठी ''ग्रीन'' अर्थातच पर्यावरणपूरक शाळेचा प्रस्ताव पुढे आला. हा प्रस्ताव प्रत्यक्षात येताना ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ''ग्रीन'' शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

नवीन इमारतीचे उद्घाटन करताना या शाळेचे श्री विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा, असे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून पूर्वीप्रमाणेच ही शाळा विद्यार्थ्यांनी गजबजत आहे. या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर पोचले आहेत. तत्कालीन राज्यपाल स्व. मृदुला सिन्हा आणि मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याकडूनही या शाळेचे कौतुक करण्यात आले होते.

पूर्वप्राथमिक विभागाच्या पटसंख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. चालू वर्षात ३०७ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यासाठी सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि मूल्ये वाढत आहेत. डिजिटल शिक्षण देण्यात येत असून गणित आणि विज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे.

– छाया बोकाडे, प्रभारी मुख्याध्यापिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com