Goa Central Library : वाचन प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. वाचन मानवाला बहुश्रुत बनविते. त्यामुळे शालेय अवस्थेतच वाचनाची गोडी लावणे गरजेचे असते. त्यासाठी अद्यावत लायब्ररी असणे गरजेचे आहे. गोव्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर लायब्ररी आहेत.
पणजीतील पाटो येथे उभारण्यात आलेली कृष्णदास शामा सेंट्रल लायब्ररी गोमंतकीयांची तसेच लायब्ररीला जगभरातून भेट देणाऱ्या वाचकांची, अभ्यासकांची, संशोधकांची वाचनाची भूक शमवत आहे.
सेंट्रल लायब्ररी ही भारतातील सर्वात जुनी लायब्ररी आहे. 15 सप्टेंबर 1832 रोजी व्हाइस रॉय डोम मॅन्युएल डी पोर्तुगाल ई कॅस्ट्रो यांनी 'पब्लिक लिव्हेरिया' म्हणून याची स्थापना केली. लायब्ररीची सुरुवात अकादमी मिलिटर डी गोवा (मिलिटरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) म्हणून झाली.
1961 मध्ये गोवा मुक्त झाल्यानंतर, ग्रंथालयाचे सेंट्रल लायब्ररी असे नामकरण करण्यात आले आणि ती शिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत होती. 2008 मध्ये सरकारने कला आणि संस्कृती संचालनालयाच्या अधिपत्याखाली सेंट्रल लायब्ररीसह सर्व सार्वजनिक लायब्ररी स्थलांतरित केली.
लायब्ररीची स्थापना 1832 साली झाली. 2012 साली नवीन इमारतीत लायब्ररी स्थलांतरित करण्यात आली. 12 हजार 100 चौरस मीटरमध्ये कृष्णदास शामा सेंट्रल लायब्ररी, पणजी बस स्थानकाजवळ उभारली आहे.
16 व्या शतकातील थोर कवी श्रीकृष्णचरित्रकथा ग्रंथाचे लेखक कृष्णदास शामा यांच्या नावावरून या लायब्ररीला नाव देण्यात आले आहे.
लायब्ररीच्या स्थापनेपासून इंग्रजी, हिंदी, मराठी, कोंकणी, पोर्तुगीज अशा विविध भाषांमधील 3 लाखांहून अधिक पुस्तके लायब्ररीत आहेत. यावर्षी सुमारे 8 हजार पुस्तकांची भर पडली आहे. ऑटोमेशनसाठी 'LIBSYS' इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर लायब्ररीत वापरले आहे. सेल्फ चेक-इन, चेक-आउट किओस्क, बुक ड्रॉप बॉक्स यासारख्या आधुनिक सुविधा RFID तंत्रज्ञान वापरून करता येते.
सेंट्रल लायब्ररी, जिल्हा लायब्ररी आणि राज्यातील 7 तालुका लायब्ररी ऑनलाइन पब्लिक ऍक्सेस युनियन कॅटलॉग सॉफ्टवेअरशी जोडलेले आहे. सेंट्रल लायब्ररीची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 व शनिवार व रविवारी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.45 आहे. 31 मार्च 2022च्या आकडेवारीनुसार लायब्ररी सदस्य एकूण 35255 तर लहान मुले 1902 आहेत. लायब्ररीची एकूण आसन क्षमता 574 आहे.
सेंट्रल लायब्ररीच्या पहिल्या मजल्यावर वर्तमानपत्रे, मॅगझिन्स, सदस्यीय नोंदणी कक्ष, बुक ड्रॉप बॉक्स तर दुसऱ्या मजल्यावर लहान मुलांचा विभाग आहे त्यात नकाशे, लहान मुलांसाठी इंटरनेट सुविधा असलेला कक्ष, ऑडियो व्हिझ्युअल हॉल, स्टडी रुम अशा सुविधा आहेत. तिसऱ्या मजल्यावर पुस्तकांची देवाण-घेवाण, कॉन्फरन्स हॉल आहे. चौथ्या मजल्यावर दुर्मिळ पुस्तके, गोव्याच्या इतिहासा संबंधित पुस्तके आहेत.
पाचव्या मजल्यावर हॅन्डबुक, शब्दकोश (Dictionary), लॅपटॉप सेक्शन, ऑडियो व्हिजुअल सेक्शन, रिडींग टेरेस आहे. सहाव्या मजल्यावर पोर्तुगीज, इंग्रजी, लॅटिन, फ्रेंच या सर्व भाषांमधील 37 हजार 482 पुस्तके आणि जर्नल्सचा संग्रह आहे. आशियातील पोर्तुगीज भाषेतील पुस्तकांचे हे सर्वात मोठे भांडार मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.