आज दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी फोंड्यातील केरये - खांडेपार भागाला भेट देऊन तेथील राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. निवडून आल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत कॅप्टननी फोंडा मतदारसंघाला दिलेली ही पाचवी भेट. अगदी ‘तुमने पुकारा और हम चले आये’ या धर्तीवर ते सध्या कार्य करताना दिसताहेत. कोणतीही समस्या उभी राहिली की खासदारसाहेब फोंड्यात हजर झालेच म्हणून समजा. त्यांच्या या कार्यतत्परतेचे सध्या फोंडा भागात बरेच कौतुकही होत आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत या कौतुकाचे रूपांतर मतदानात होऊन गेल्यावेळी ६४० मतांनी हुकलेला फोंड्याचा गड यावेळी कॅप्टन काँग्रेसला सर करून देऊ शकतात का हे मात्र बघावे लागेल. ∙∙∙
कला अकादमीची संरचना चार्ल्स कुरैय्या यांनी तयार केली. देशातील स्थापत्यकलेचा एक नमुना म्हणून कला अकादमीच्या इमारतीकडे अजूनही पाहिले जाते. या अकादमीतील खुल्या थिएटरचा रंगमंच ढासळल्यानंतर राज्यभर तसेच विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. अशावेळी अकादमीची सूत्रे सांभाळणाऱ्या आणि लोकमतामुळे जे पद मिळाले आहे, त्या पदावरील महनीय व्यक्तीकडून चार्ल्स कुरैय्या कौन? असा प्रश्न विचारला गेला होता. आता त्याचा विसर काहीजणांना पडलाही असेल. कारण आता म्हणे ‘विजय केंकरे कौन?’ असा प्रश्न त्या महोदयाने विचारला. त्यामुळे अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या तपासणीसाठी नेमलेल्या कृती दलाच्या आणखी काही बैठका होणार आहेत, त्यानंतर कोण व्यक्ती काय बोलला आणि त्यावर तेव्हा... ‘वो कौन?’ असे प्रश्न महोदयांकडून विचारले गेलेच, तर त्याची सवय ऐकणाऱ्यांनाही करून घ्यावी लागेल. कारण उगाच त्यानंतर अशा विषयावर चर्वितचर्वण करणे योग्य ठरणार नाही. ∙∙∙
गोव्यातील राजकारणात रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे एकमेव आमदार असलेले वीरेश बोरकर यांनी गोव्यातील अनेक समस्या सरकारच्या नजरेस आणून दिल्या. मात्र, काही काळानंतर त्यांच्यावर स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्याचे आरोप झाले. आता ते आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तेव्हा त्यांच्याकडून राज्यस्तरीय मुद्यांवर बोलण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. पक्षाचे प्रमुख मनोज परब लोकांना दिसत नसल्याने आम्हाला केवळ बोरकर यांच्याकडून अपेक्षा असल्याचे राज्यातील रिव्होल्युशनरी बोलू लागले आहेत.∙∙∙
गोव्यात सध्या भाजपची सदस्य नोंदणी मेाहीम सुरू आहे. सुरवातीला जरी दहा लाख सदस्यांचे उद्दीष्ट ठेवलेले असले वा तसे जाहीरही केले असले तरी प्रत्यक्षांत चित्र मात्र वेगळेच आहे. आता भाजप सदस्य होणे म्हटले की, प्रत्येकजण म्हणे अंग चोरतो. त्यामागील कारणे जरी स्पष्ट होत नसली तरी लोकांत सरकारबद्दलची नाराजी हे कारण असल्याचे बोलले जातेय. प्रथम कागदोपत्री सदस्य नोंदणी केली तरी आता ॲपव्दारे नोंदणीसाठी भाजप कार्यकर्ते परत फिरत आहेत व यावेळी त्यांना विपरित अनुभव येतोय म्हणे. प्रथम सदस्य झालेले ॲपव्दारे नोंदणी टाळत असून तेव्हा नोंदणीला आलेल्यांना स्थानिक आमदार वा जि. पं. सदस्य तेथील समस्यांकडे करत असलेल्या दुर्लक्षाबाबत प्रश्न करत असून त्यामुळे या कार्यकर्त्यांची कुचंबणा होतेय. काहींना ॲपवर नोंदणी करताना सध्या ऑनलाईन जे घोटाळे होत आहेत, त्याची म्हणे भीती वाटतेय. पण भाजपने लोक उपस्थित करत असलेल्या प्रश्नांकडे गांभिर्याने पहाण्याची वेळ आलीय, अनेक भागात लोकप्रतिनिधींचा जनसंपर्क पूर्वीप्रमाणे नाही, ती धोक्याची घंटा तर नाही ना, असा सवाल केला जातोय.∙∙∙
भाडेपट्टीवर चारचाकी आणि दुचाकी वाहने दिल्याने पर्यटकांची सोय होत असल्याचे कारण दिले जाते. परंतु या वाहनांमुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून अपघातांनासुद्धा ती कारणीभूत ठरते. दररोज या वाहनांचे नवीन व्हिडिओ व्हायरल होत असल्याने त्यांच्यामुळे होणारी गैरसोय उघड होते. मांडवी पुलावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या रेंट – ए – कारचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा गोवेकरांचा संताप उफाळून आला. एवढी प्रकरणे होऊन देखील सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने आणखी किती काळ लोकांना हे सहन करावे लागणार असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. ∙∙∙
राज्यातील खड्डे गणेशचतुर्थीपूर्वी बुजवण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. गणेशचतुर्थी झाली, दसरा गेला व दिवाळी आली, तरी रस्त्यांवरील खड्डे काही बुजवले गेले नाहीत. ज्या ठिकाणी डागडुजी केली गेली आहे, तीसुद्धा काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे पुन्हा उखडून गेली आहे. रस्त्यावरील खड्डे संबंधित कंत्राटदारांकडून बुजवून घेतले जातील तसेच वारंवार खड्डे पडणाऱ्या त्या रस्त्याच्या कामाच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे घोषित केले होते. आत्तापर्यंत सरकारकडून केलेल्या या घोषणा हवेतच विरलेल्या आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागणार आहे हे सरकारच जाणे. अपघाताला हे खड्डे कारणीभूत आहेत. त्यामुळे ते बुजवण्याचे काम प्राधान्यक्रमाने हाती घ्यायचे असले, तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला राज्यात मोठ्या प्रमाणात नरकासुर प्रतिमा उभ्या केल्या जातात व त्या पाहण्यासाठी लोकांची व वाहनांची गर्दी होते. त्यावेळी रस्ता अपघात होण्याची वाट सरकार पाहते आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. ∙∙∙
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने इतर काही पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. मंत्री व आमदारांना सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या पोलिसांकडून सरकारी नोकऱ्यांची कामे होऊ शकतात असा काही लोकांचा भ्रम आहे. काही सुरक्षा पोलिस कर्मचारीही ते मंत्री व आमदारांच्या सेवेत असल्याने त्याचा गैरफायदा उठवतात. सरकारी नोकरीसाठी धडपड करणारे या कर्मचाऱ्यांना बळी पडतात. पोलिस खात्यातही काहीजण आहेत जे अशा प्रकरणांमध्ये गुंतलेले आहेत. पोलिस खात्यातील नोकरभरतीवेळी अनेकांनी काही पोलिसांना पैसे दिलेले होते. ज्यांचे काम झाले नाही त्यांचे पैसेही अजून परत केलेले नाहीत. जर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रारी दाखल केल्या, तर पितळ उघडे पडेल या भीतीने काही पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. फसवणूक झालेले संबंधित पोलिसांविरोधात तक्रार करण्यास धाडस दाखवत नाहीत. कारण पोलिस स्थानकातील पोलिसच तक्रारदाराला अनेक प्रश्न विचारून नामोहरम करतात व दबाव आणतात. ∙∙∙
दिवाळी म्हटली की गोव्यात नरकासुर स्पर्धा आलीच. पूर्वी शहरात किंवा गावात एक दोन नरकासुर तयार करायचे. नरकासुर स्पर्धाही नव्हत्या. आता नरकासुर स्पर्धांचे पेवच फुटले आहे. बक्षिसांची रक्कम तर तोंडात बोट घालण्याइतपत. स्पर्धांची संख्याही वाढली आहे. वाड्यावाड्यांवर नरकासुर स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे नरकासुरांची मागणीही वाढली आहे. काही लोक रेडिमेड नरकासुर विकत घेतात व स्पर्धेत सहभागी होतात आणि परीक्षक मंडळ त्यांना बक्षीस देते. त्यामुळे जे युवक किंवा मुले अनेक दिवस परिश्रमपूर्वक स्वतःच्या हाताने पारंपरिक पद्धतीचा नरकासुर बनवतात त्यांच्यावर मात्र अन्याय होत असतो. आता गोव्यात बुधवारी रात्री नरकासुर स्पर्धा होणार आहेत. तेव्हा परीक्षकांनी ज्यांनी परिश्रम घेतले आहेत, स्वतःच्या हातांनी पारंपरिक नरकासुर बनविले आहेत, त्यांचाच परीक्षकांनी व आयोजकांनी बक्षिसांसाठी विचार करावा असे गेल्या दोन वर्षांपासून ज्यांच्यावर या स्पर्धांमध्ये अन्याय होत आहे ते म्हणू लागले आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.