
Retired NRI Viral Post: गेल्या १२ वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहत असलेल्या एका ४१ वर्षीय अनिवासी भारतीयाने (NRI) लवकर निवृत्ती घेऊन भारतात, विशेषतः गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुमारे १४ कोटींची संपत्ती जमा करून तो 'भारताचा' अनुभव घेण्यासाठी आणि त्याच्या आवडत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी परत आला.
मात्र, अवघ्या दोन वर्षांतच त्याचा भ्रमनिरास झाला असून, आता त्याने परत इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. या NRI ने Reddit वर केलेली एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यात त्याने भारतातील खराब पायाभूत सुविधा, नागरिक शिस्तीचा अभाव आणि रोजच्या जीवनातील निराशा स्पष्टपणे मांडली आहे.
आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, "एकंदरीत सांगायचे झाल्यास, इथे काहीच चालत नाही. रस्ते खराब झाले आहेत, खाण्यापिण्याचा दर्जा निकृष्ट आहे, स्वच्छतेची अवस्था वाईट आहे, आणि महागड्या सुविधाही समाधान देत नाहीत. मी सोलर पवार, बॅकअप वीज आणि वायफायसाठी युपीएससारखे उपाय करून पाहिले, पण तरीही जीवन कंटाळवाणे वाटत आहे."
त्याने कचरा-भरलेले किनारे, वाढते प्रदूषण, आक्रमक सामाजिक वर्तन, अव्यवस्थित विमानतळ आणि जास्त दरातही मुंबई, दिल्ली आणि बंगळूरूसारख्या मोठ्या शहरांवर अवलंबून असलेल्या हवाई प्रवासावरही नाराजी व्यक्त केली. गोव्याबद्दल बोलताना, त्याने 'दारू पिण्याव्यतिरिक्त इथे कोणतीही खरी संस्कृती नाही' आणि 'या राज्यात कुठलीही कला किंवा वारसा नाही,' असे स्पष्टपणे लिहिले.
या पोस्टने अनेक अनिवासी भारतीयांच्या भावनांना स्पर्श केला. अमेरिकेतून नुकत्याच दक्षिण भारतात परतलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ‘अमेरिकेत गाडी चालवताना मला शांत वाटते. पण इथे चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, शिस्त नसणे, हॉर्नचा आवाज आणि प्रदूषण यामुळे मला राग येतो. नुसते चालतानाही त्रास होतो.'
बंगळूरूमधील अनुभवांबद्दल बोलताना एकाने लिहिले की, ‘विमानतळावर फसवणूक होण्यापासून ते खराब रस्त्यांपर्यंत, हॉर्न आणि कुत्र्यांमुळे झोप नसलेल्या रात्री, आणि गटाराचा सततचा वास, सगळं काही एक संघर्ष वाटतं. अगदी उबरची राइडसुद्धा एक जुगारच असते, जिथे गलिच्छ गाड्या, तुटलेले सीट बेल्ट आणि १० मिनिटांनी राइड रद्द करणारे ड्रायव्हर्स मिळतात.'
या सर्व निराशाजनक प्रतिक्रियांमध्ये एका व्यक्तीने एक वेगळा दृष्टिकोन मांडला. 'भारताचे वर्णन करायचे झाल्यास, तो गोंधळ आहे,' असे त्याने लिहिले. 'काहीजण या गोंधळाकडे आकर्षित होतात आणि त्यात समरस होतात, तर काहीजण दूर जातात आणि सोडून जातात. यात काहीही बरोबर किंवा चूक नाही, फक्त तुमचा मार्ग निवडायचा असतो.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.