Shelde Quepem Hill Cutting
केपे: राज्य सरकारने डोंगर कापणीविरोधात कडक भूमिका घेतली असताना बऱ्याच ठिकाणी डोंगर कापणी करून प्लॉट तयार केले जात आहेत. अशीच डोंगरकापणी शेल्डे पंचायत क्षेत्रात झाली असून याविरोधात या भागातील ग्रामस्थांनी शेल्डे पंचायतीच्या ग्रामसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर आज भरारी पथकाने या भागाची पाहणी केली.
काही महिन्यांपूर्वी सोनफातर-शेल्डे येथील हाऊसिंग बोर्डला लागून असलेल्या डोंगराची मोठ्या प्रमाणात कापणी केली होती. या डोंगर कापणीविषयी रविवार, ३ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी याविषयी पंचायत मंडळाला प्रश्न विचारून त्या जागेवर कोणतेच बांधकाम करण्यास आमचा विरोध असल्याचे सांगितले होते. या जागेची पाहणी करण्याची मागणी केली होती.
आज सकाळी दक्षिण गोव्याच्या भरारी पथकाने शेल्डे येथील त्या जागेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी या कामाला विरोध करणारे प्रशांत गावस देसाई, पंचसदस्य अमेय चिमूलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रशांत गावस देसाई यांनी सदर डोंगर कापणी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली.
मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी केल्याने पावसाळ्यात ढगफुटी होऊन सखल भागात असलेल्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी या जागेवर कोणतेच बांधकाम होता कामा नये व झाल्यास या कामाला आमचा तीव्र विरोध असेल. शेल्डे येथे जैवविविधता समिती असून या समितीतर्फेही याला विरोध आहे. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी यात लक्ष घालून अशी डोंगर कापणी या पुढे कोणत्याच भागात होता कामा नये याकडे लक्ष द्यावे, असे प्रशांत गावस देसाई यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.