Rumdamol panchayat : रुमडामळ-दवर्ली ग्रामपंचायत सदस्य विनायक वळवईकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव सोमवारी काहीसा निवळला; परंतु उद्भवलेल्या वादाची धग कायम आहे.
पोलिसांनी दोन्ही गटांतील प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले असून काही सूचना केल्या आहेत. परिसरात तूर्त पोलिस कुमक कायम असून हल्ला प्रकरणी दुसऱ्या संशयितालाही अटक करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री पंच सदस्य वळवईकर हे कारमध्ये असताना मास्क परिधान करून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूहल्ला केला होता. सतर्कतेमुळे वार चुकला आणि ते बचावले. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून आयुब खान या संशयिताला अटक केली होती.
त्याला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, दरम्यान, दोन गटांत कधीही वाद उफाळू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
रुमडामळ पंचायत बरखास्त करा : वळवईकर
हल्ला प्रकाराचा निषेध
पंच सदस्य वळवईकर यांना फेसबुकवरून धमकी दिल्याच्या आरोपाखाली मायणा-कुडतरी पोलिसांनी वास्को येथील अब्दुल रझाक याला अटक केली आहे. वळवईकर हे आज आपल्या पाठीराख्यांसह मायणा पोलिस स्थानकावर गेले होते. या प्रकरणी तपासाची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, हिंदू जनजागृती समितीने घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.
‘तणाव का वाढविला?’
रुमडामळ-दवर्ली पंचायतीचे पंच उमर पठाण म्हणाले, विनायक वळवईकर यांच्यावर जो हल्ला झाला आहे, त्याचे समर्थन कुणीच करणार नाही आणि हल्ला केलेल्या संशयितावर कारवाई ही झालीच पाहिजे. मात्र, या संशयिताला अटक केल्यानंतरही रुमडामळ येथे मोर्चा काढून धार्मिक तणाव निर्माण करण्याची काय गरज होती?
दोन्ही गटांना सूचना
सलोख्याला बाधा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य घडू नये यासाठी पोलिस दक्षता घेत आहेत. संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येईल. दोन्ही गटांतील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठक घेण्यात आली असून संबंधितांना खास सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या पोलिस कुमक कायम ठेवण्यात आली आहे.
- संतोष देसाई, पोलिस उपअधीक्षक
‘बेकायदेशीर कृत्यांना आळा नाही, तोपर्यंत तेढ राहणार’
रुमडामळ पंचायत क्षेत्रात अनेक बेकायदा कृत्ये सुरू असून त्यांना पंचायतीचा पूर्ण पाठिंबा आहे. परवानगी नसताना बांधकामे सुरू आहेत. ती बंद करण्यासाठी पंचायत पुढाकार घेत नाही. जोपर्यंत परिसरातील बेकायदेशीर कृत्यांना आळा बसत नाही, तोपर्यंत तेढ कायम राहील. सरकारने दखल घेऊन पंचायत बरखास्त करावी, अशी मागणी रुमडामळ येथील पंच विनायक वळवईकर यांनी केली.
वळवईकर म्हणतात...
पंचायत क्षेत्रात वाढती बेकायदेशीर बांधकामे, बेकायदा स्क्रॅपयार्ड, गोमास विक्री दुकाने हे आक्षेपाचे प्रमुख कारण आहे. शिवाय त्यामुळे अरुंद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
शंभर चौरस मीटर जागेत तीन मजली इमारती उभ्या होतात. ज्या घरांमध्ये बेकायदेशीर मदरसा सुरू आहे, तो बंद करावा. दोन महिन्यांपूर्वी पंचायतीमध्ये तसा ठराव मंजूर करण्यात आला होता.
अजूनही आक्षेपार्ह मदरसा बंद करण्यासाठी नोटीस पाठविण्यात आलेली नाही. येथे मुस्लीम वा हिंदू असा भेदभाव मुळीच नाही!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.