
पणजी: गोव्याच्या पावसाळी अधिवेशनाचा सहावा दिवस (सोमवार, २८ जुलै) सुरू होण्यापूर्वीच फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमीच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित करत अकादमीच्या समितीला घेरले. कला अकादमीच्या पुनर्बांधणीसाठी आणखी २० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे विजय सरदेसाई म्हणाले आहेत आणि या प्रकल्पाच्या भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कला अकादमीच्या कामाची गती मंदावली आहे आणि ते पूर्णत्वास जाण्याचे नाव घेत नाही. अनेकवेळा दुरुस्त्या करूनही इमारतीचे काही भाग पुन्हा ढासळत असल्याचे चित्र आहे. या प्रलंबित कामासाठी सरकारने टास्क फोर्स समिती नेमली असली तरी, या समितीच्या कामकाजावर सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली. टास्क फोर्स समितीतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कला अकादमीचे काम व्यवस्थित पूर्ण करायचे असल्यास आणखी २० कोटी रुपये खर्च करावे लागतील. यावर उपहासात्मक टिप्पणी करत आमदार सरदेसाई म्हणाले की, "याचा अर्थ हा 'ताजमहाल' आता शंभरी गाठणार आहे."
सरदेसाई यांनी पुढे नमूद केले की, या २० कोटी रुपयांमध्ये राज्यात आणखी १० रवींद्र भवने उभारणे शक्य आहे. काही दिवसांपूर्वीच कला अकादमीतील व्हायोलिन क्लासच्या इमारतीच्या छताचा एक तुकडा पडला होता. आणि आता संपूर्ण इमारतीसाठी किमान २० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांना समजल्याचे त्यांनी सांगितले.
एवढा मोठा खर्च करूनही कला अकादमीची इमारत पूर्णपणे पूर्ववत होईल का, किंवा भविष्यात पुन्हा इमारतीचा कोणताही भाग कोसळणार नाही ना, याची शाश्वती देता येत नसल्याची चिंताही सरदेसाई यांनी यावेळी व्यक्त केली. या मुद्द्यावर सभागृहात अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. कला अकादमीच्या कामाची गती आणि वाढलेला खर्च हे दोन्ही मुद्दे सध्या गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.