पणजी: आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खेळताना विजयी मानसिकता अतिशय महत्त्वाची असेल, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार ब्रुनो कुतिन्हो यांनी रविवारी एफसी गोवा संघास दिला. एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविणारा एफसी गोवा पहिला भारतीय संघ ठरला आहे. स्पर्धेच्या ई गटातील सामने 14 एप्रिलपासून गोव्यात खेळले जातील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी इराणच्या पर्सेपोलिस संघासमोर संयुक्त अरब अमिरातीच्या अल-वाहदा संघाचे, तर एफसी गोवासमोर कतारच्या अल-रय्यान संघाचे आव्हान असेल. (Victory mentality required: Bruno Coutinho)
ब्रुनो यांनी एफसी गोवाच्या प्रतिस्पर्ध्यांविषयी सांगितले, की ``या स्पर्धेतील संघ उच्च दर्जाचे फुटबॉल खेळणारे आहेत. त्यांच्यासाठी ही पहिलीच स्पर्धा नाही आहे. त्यांच्यापाशी खूप चांगले खेळाडू आहेत आणि पश्चिम आशियाई देशातील या संघांविरुद्ध खेळणे सोपे नसेल. तुलनेत आम्ही पदार्पण करत आहोत. त्यामुळे आम्हाला फारच सावध राहावे लागेल. तरीही घाबरण्यासारखे काहीच नाही. विजयी मानसिकतेसह मैदानावर जावे लागेल, जे जास्त महत्त्वाचे आहे. '' आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणे ही मोठी संधी आणि सन्मान असल्याचे ब्रुनो यांना वाटते. 2019-20 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड जिंकून एफसी गोवाने आशियाई क्लब पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
भारतात ही स्पर्धा प्रथमच खेळली जात आहे. एफसी गोवाने प्रतिस्पर्ध्यांवर आघात करण्याच्या उद्दिष्ट बाळगून खेळावे असे सांगत ब्रुनो यांनी भारतीय संघास सुयश चिंतिले आहे. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार असलेले ब्रुनो कुतिन्हो निष्णात स्ट्रायकर होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्यांनी भारताचे 44 सामन्यांत प्रतिनिधित्व केले. 1996 मध्ये त्यांना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरविले होते. 2002 साली त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला, या प्रतिष्ठेचा बहुमान मिळविणारे ते गोव्याचे अवघे दुसरे क्रीडापटू आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.