Goa Politics: खरी कुजबुज, शिक्षणाच्‍या आयचा घो!

Khari Kujbuj Political Satire: वार्का येथे येणाऱ्या पर्यटकांनी वार्काचीच टॅक्सी घेण्याचा जो तर्क लढविला जात आहे, त्यावर राधाराव ग्रॅसियस यांनी जशाच तसे उत्तर दिले आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

शिक्षणाच्‍या आयचा घो!

गोव्‍यातील शिक्षण क्षेत्रात काम करणारे काही सरकारी शिक्षक आपल्‍या कामाला खरेच न्‍याय देतात का? सरकारी विद्यालयात लॅब असिस्‍टंट म्‍हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा सध्‍याचा कारभार पाहिल्‍यास हा प्रश्‍न नेमका तोंडावर येतोच. काही राजकारण्‍यांना आपला काका आणि मामा म्‍हणणाऱ्या या हायप्रोफायल लॅब असिस्‍टंटने आपल्‍या मुख्‍याध्‍यापकाला मामा बनविलेला आहे असे वाटते. कारण हा कर्मचारी म्‍हणे, आठवड्यातून एकदाच आपल्‍या विद्यालयात येतो आणि हजेरीपटावर सात दिवसांच्‍या सह्या ठोकून जातो. याच कर्मचाऱ्याचे हे प्रताप कित्‍येकांच्‍या कानी पडलेले आहेत. मात्र तरीही शिक्षण संचालकापर्यंत ही गोष्‍ट पोचलेली नाही का? ∙∙∙

जशास तसे!

वार्का येथील टॅक्सीवाल्यांची टॅक्सी बुक न केल्याने वार्का येथील खासगी टॅक्सी चालकांनी युकेतील पर्यटकांना कसे वेठीस धरले, याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यात आमदार वेंझीने सहभागी होत व्होकल फॉर लोकल्सचा नारा दिला आहे. पण वार्का येथे येणाऱ्या पर्यटकांनी वार्काचीच टॅक्सी घेण्याचा जो तर्क लढविला जात आहे, त्यावर राधाराव ग्रॅसियस यांनी जशाच तसे उत्तर दिले आहे. अशी पर्यटकांकडे दादागिरी करणाऱ्या टॅक्सी चालकावर उद्या पोलिस केस झाली, तर त्यांची केस लढविण्यासाठी ते वार्का येथीलच वकील निवडणार का? आणि दुसरा कुठला वकील निवडल्यास वार्का येथील वकील त्या वकिलाला मारण्यास तर येणार नाहीत ना? ∙∙∙

खाकी वर्दीची लक्तरे!

पोलिस खाते हे खरे तर शिस्तीने चालणारे असावे, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. कारण पोलिसच जर बेशिस्तीने वागू लागले, तर ते लोकांना शिस्तीचे धडे कसे देणार? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. पण हल्लीच्या काळात खाकी डगल्यात वावरणारे पोलिसच गुन्हेगार म्हणून अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. परवा दोना पावला येथे जो दरोडा पडला, तो भाग म्हणे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे तेथे म्हणे महिना-पंधरवडाभर पोलिस गस्तीची फेरी होत नाही. या यंत्रणेला आता भरपूर वाहने व अन्य सामग्री दिलेली असूनही अशी बेपर्वाई का होते, अशी विचारणा होऊ लागलेली आहे. त्यानंतर कोकणरेल्वे पोलिसांच्या निरीक्षकाला लांच घेताना झालेली अटक, ही या दलाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. कारण याच अधिकाऱ्याला मागे अंमली द्रव्य प्रकरणात पकडले होते. अशा प्रकारानंतर लोकांच्या मनांत पोलिसांविषयी आदर तो कसा उरणार? असा प्रश्न आता केला जात आहे. ∙∙∙

भोमवासीय रस्त्यावर येणार!

भोम गावातील चौपदरी रस्ता प्रकरण सध्या ऐरणीवर आले आहे. सरकार गावातूनच चौपदरी रस्ता करण्यावर ठाम आहे, मात्र ग्रामस्थांनी गावातील या रस्त्याला तीव्र विरोध करीत चौपदरी रस्त्याची मागणी केली आहे. सरकार आणि ग्रामस्थ आपापल्या ठिकाणी ठाम असल्याने सरकारने जर जबरदस्तीने रस्ता करण्यासाठी कार्यवाही केली, तर ग्रामस्थ रस्त्यावर येतील, हे नक्की. सध्या तरी ग्रामस्थ आणि सरकारमध्ये तणाव आहे, आणि हा तणाव वाढण्या अगोदर सरकारनेच एक पाऊल मागे घेतलेले बरे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ∙∙∙

सरकारी मालमत्ता दुर्लक्षित

गोव्यात जमिनीचे घोटाळे मोठ्या प्रमाणात होत असून त्यांच्या चौकशीसाठी खास पथकही नियुक्त केलेले आहे. पण मुद्दा तो नाही, तर सरकारने गेल्या काही वर्षात नव्हे तर म. गो. राजवटीवेळी विविध कारणासाठी संपादन केलेल्या जमिनी सध्या मडगावात दुर्लक्षीत असून कदाचित त्या जागांवर कोणी बिल्डर इमारती तर उभारणार नाही ना? असा संशय आता व्यक्त होत आहे. आके मारुती मंदिराजवळ चार भूखंड दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. त्यातील एका ठिकाणी मलनिस्सारण इमारत आहे, तर त्याला लागून सरकारी पंप गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यांतील एका भूखंडावर मागे स्व. पर्रिकर यांनी आयटीआयसाठी इमारत बांधण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण पुढे काही झालेले नाही. या जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्या अशाच दुर्लक्षित राहिल्या तर कोणी त्या हडप तर करणार नाही ना? अशी भितीही व्यक्त होत आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, मुख्यमंत्री कार्यक्रम टाळणार नाहीत...

भोमवासीयांचे पारडे जड

भोमवासीयांना आता इतर गावांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याचे मोजमाप घेतेवेळी भोमाशिवाय इतर गावातील लोकांनीही आपला पाठिंबा भोमवासीयांना दिला. यापूर्वी भाजप सोडून इतर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी भोम गावात येऊन आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे सध्या तरी भोमवासीयांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: अभिनेते शरद पोंक्षेंना ‘सुपारीबाज’ म्हणणे खालच्या पातळीचे! मंत्री गावडेंना बडतर्फ करा; काँग्रेसची मागणी

खरेच गुडलरला फसविले?

शंभर गुन्हेगार सुटल्यास हरकत नाही, मात्र एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, या तत्वावर आपली न्याय व्यवस्था चालते. मडगाव रेल्वे पोलिस स्थानकाचे पोलिस. निरीक्षक सुनील गुडलर व एका पोलिस शिपायाला एसीबीने अटक केली. परराज्यातून गोव्यात रेल्वेने बेकायदेशीर गोमांसाची गोव्यात आयात करणाऱ्या बीफ माफियाकडून लाच घेतल्याचा आरोप पोलिस निरीक्षक गुडलर यांच्यावर आहे. मात्र यात काळेभोर असल्याचा आरोप गोरक्षक राजीव झा यांनी केला आहे. गुडलर बेकायदेशीर गोमांस गोव्यात आणणाऱ्या बीफ माफिया विरोधात कडक कारवाई करायचा व याचा फटका बीफ माफियाना बसायला लागला होता. काटा काढण्यासाठी याच बीफ माफियानी षडयंत्र रचून गुडलर यांचा काटा काढला असल्याचा आरोप होत आहे. यात जर तथ्य असेल तर ते भयानक म्हणावे लागेल. सरकारने यावर सखोल चौकशी करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून ‘दूध का दूध व पानी का पानी’ दाखवून द्यावे, अशी गोप्रेमी व मांस प्रेमीची अपेक्षा आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com