पणजी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळनंतर काळ्या काचांच्या वाहनांविरोधात पोलिसांनी नाकाबंदी तसेच धडक मोहीम सुरू केली आहे. मद्यसाठा व रोख रक्कम प्रचारासाठी वापरण्याची शक्यता असल्याने अशा वाहनांची कसून चौकशीचे करण्याचे निर्देश राज्यात आलेल्या निवडणूक निरीक्षकांनी सरकारी यंत्रणेला दिले आहेत. (vehicles with black coated windows on goa police's radar)
मालवाहू वाहनांवरही कडक नजर
यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. काही ठिकाणी उमेदवार प्रचारावेळी मतदारांना (Voter) आमिष दाखवण्यासाठी वस्तू तसेच रोख रकमेचे वितरण केले जाणार असल्याच्या तक्रारी निवडणूक कार्यालयाकडे काही उमेदवारांनी केल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी झोपडपट्टी भागात निमलष्करी पोलिसांची (Goa Police) गस्त वाढवण्यात आली आहे. 24 तास जवानांचे पथक गस्तीवर असेल. शिवाय राज्यात आलेले निवडणूक निरीक्षक तसेच भरारी पथकेही सक्रिय झालेली आहेत. रात्रीच्यावेळी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी गोवा पोलिस व निमलष्करी पोलिस यांना संशयास्पद ठिकाणी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पोलिस व अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. वापरायच्या वस्तूंच्या विक्रीवरही निवडणूक अधिकाऱ्यांनी नजर ठेवली आहे.
मालवाहू वाहनांची विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सर्वेलन्स केंद्राच्या पोलिस पथकाकडून तपासणी केली जात आहे. त्यामध्ये असलेल्या मालाची बिले तसेच तो कोणत्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे याची माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे यावेळी मतदारांना आमिषे दाखवून मते घेण्याच्या उमेदवारांच्या प्रयत्नांवर करडी नजर ठेवली जात आहे. रात्रीच्यावेळी काळ्या काचांच्या वाहनांतून फिरून मतदारांवर विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रात्रीच्यावेळी ही वाहने काही भागात फिरत असल्याच्या तक्रारी आल्याने मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण पोलिस अधिकाऱ्याने दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.