Vegetable Price Hike In Goa: वाढत्या महागाईने गोमंतकीय हैराण! स्थानिक भाज्या खाताहेत भाव; नारळाचे दर भडकलेलेच
पणजी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. कांदा, टोमॅटोचे दर वरखाली होत आहेत. काही प्रमाणात फळभाज्यांचे दर आवाक्यात असून स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाज्या मात्र अधिक भाव खात आहेत.
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले
दरम्यान, पणजी (Panaji) बाजारात लाल मुळा व इतर पालेभाज्या 50 रुपयांना तीन जुडी दराने विकली जात आहेत. अनेक नागरिक बेळगावहून येणाऱ्या पालेभाज्यांपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. मागील आठवड्यात टोमॅटोच्या दराने पन्नाशी गाठली होती, परंतु गुरुवारी पणजी बाजारात 40 रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात आहे. कांदा बटाटा 50 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. फळभाज्यांचे दर मागील आठवड्यापासून स्थिर आहेत. मागील तीन -चार महिन्यांपासून वाढलेल्या लसणाच्या दराचा भडका कायम असून 350 ते 400 रुपये प्रती किलो आहे.
नारळाचेही दर भडकलेलेच
सध्या हळदी कुंकू आणि इतर काही धार्मिक कार्यांसाठी तसेच जेवणासाठी नारळाची मागणी आहे. पणजी बाजारात मध्यम आकाराचा एक नारळ 40 रुपये प्रतिनग दराने विकला जात आहे. लहान आकाराचा नारळ 30 रुपये तर चांगल्या जरा मोठा नारळ 50 ते 60 रुपये प्रती नग विकला जात आहे.
नारळाचे (Coconut) दर वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसत आहे. नारळाच्या दरात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या हवामानामुळे नारळाचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. बागायतदारांकडे नारळ उपलब्ध नसल्याने त्याचे दर वाढले आहेत. हॉटेल व्यावसायिकांकडूनही नारळासाठी दररोज मागणी असते. त्यांनाही नारळ महागड्या दराने विकत घ्यावे लागतात. त्यामुळे खाद्य पदार्थाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
केरळ, कर्नाटकातून पुरवठा कमी
गोव्यात केरळ, कर्नाटक व इतर राज्यातून नारळ आयात केला जातो, मात्र त्या ठिकाणीही खराब हवामानाचा फटका बसून नारळ उत्पादन घटले आहे. त्यामुळे गोव्यात नारळ कमी प्रमाणात दाखल व्हायला लागले आहेत, अशी माहिती बोर्डा येथील प्रमुख विक्रेत्याकडून प्राप्त झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.