वास्को : मुरगाव हार्बर येथील समुद्र किनारी प्लास्टिक कचऱ्यामुळे अस्वच्छता पसरली आहे.मुरगाव पत्तन प्राधिकरणच्या (एमपीए) पर्यटक जहाज धक्क्यासमोरच टेकडीवर पर्यटक व वाहन चालकांकडून ‘स्वच्छ भारत अभियान’चा फज्जा उडवला जात आहे.
संपूर्ण टेकडीखाली प्लास्टिक, मद्याच्या बाटल्यांबरोबर खाण्यापिण्याचे साहित्य समुद्र किनारी टाकण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण हार्बर परिसर अस्वच्छ बनला आहे. मुरगाव पत्तन प्राधिकरण व मुरगाव पालिकेने हार्बर समुद्र किनाऱ्यावरील कचरा हटवावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
मुरगाव हार्बर एमपीएच्या क्रुझ धक्यावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे येण्याचा मौसम सुरू असून येथे मोठ्या प्रमाणावर देशी - विदेशी पर्यटक येत आहेत. तसेच त्यांना गोवा दर्शनासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक पर्यटक टॅक्सी सेवा देत आहेत. परंतु हार्बर समुद्र किनारी पर्यटक जहाजे पाहण्यासाठी येणारे काही नागरीक सर्रासपणे खाण्यापिण्याचे साहित्य,
प्लास्टिक कचरा समुद्र किनारी टेकडी खाली टाकून जात आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत एमपीए मुरगाव सडा जेटी - बोगदा -बायणा व वास्को परिसरात स्वच्छता मोहीम राबवत आहे.मात्र, हार्बर समुद्र किनारी कचरा एमपीए अधिकाऱ्यांना दिसत नाही. पालिका प्रभाग 1 ते 13 पर्यंत एमपीए तर्फे स्वच्छता अभियान राबवत आहे.
स्टिकर लावून स्वच्छता होत नाही !
एमपीएने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुरगाव हार्बर परिसरातील कचरा गोळा करणे सुरू केले पाहिजे. एमपीएने ‘स्वच्छ भारत - नितळ गोंय’ असे स्टिकर आपल्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवर लावले म्हणून, परिसर स्वच्छ होत नाही. यासाठी संबंधित विभागाने संपूर्ण परिसराची स्वच्छता करणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.