Vasco: वास्को शहर बॅनरमुक्त करण्यात येईल, असे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांनी भूमिका जाहीर केल्यावर लगोलग मुरगाव पालिकेने ठिकठिकाणचे बॅनर काढण्याचे काम हाती घेतले. यामुळे वास्कोवासीयांनी समाधान व्यक्त केले.
वास्को मतदारसंघातील लाडली लक्ष्मी लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वास्को भाजपा मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेविका शमी साळकर, लविना डिसोझा, फियोला रेगो, जयंत जाधव उपस्थित होते.
वास्को शहरात ठिकठिकाणी बॅनर नजरेस पडत आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येते. या बॅनरमुळे काहीवेळा वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. तसेच काहीवेळा वाहतूक नियमासंबंधी फलकांसमोर बॅनर लावल्याने वाहनचालकांना फलक नीट दिसत नाहीत.
याप्रकरणी दखल घेताना आमदार साळकर यांनी शहर बॅनरमुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला. यासाठी लवकरच मुरगाव पालिका मंडळाची बैठक होणार आहे.
त्या बैठकीत बॅनर लावण्यासाठी बंदी घालणारा ठराव घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बॅनर लावण्यासाठी मुरगाव पालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात येत नाही. त्यामुळे मुरगाव पालिकेला महसूल मिळत नसल्याचे ते म्हणाले.
‘वास्को ठरणार पहिले बॅनरमुक्त शहर’
वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक यांनी आमदार साळकर यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले. चंदीगड शहरामध्ये बॅनर लावण्यास बंदी आहे. त्यामुळे त्या शहराच्या सौंदर्याला बाधा येत नाही. वास्को शहराबाबत साळकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे वास्को शहर बॅनरमुक्त होणारे गोव्यातील पहिले शहर ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.