

वास्को: उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी महामार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक जयरामनगरच्या अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यास रहिवाशांनी आपला विरोध मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली व इतर सरकारी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला.
चार ते पाच दिवस या अंतर्गत रस्त्याने ठीक आहे; परंतु सहा महिने या रस्त्यावरून वाहतूक वळविण्यास आमचा विरोधच असेल, असे त्या रहिवाशांनी स्पष्ट केले. या अंतर्गत रस्त्यांची पाहणी उपजिल्हाधिकारी करमली यांच्यासह इतरांनी मंगळवारी (ता. २) केली असून त्यासंबंधीचा अहवाल ते जिल्हाधिकारी कार्यालयाला देणार आहे.
दाबोळी-बोगमाळो चौक ते एमईएस चौक या दरम्यान उड्डाण पुल बांधकाम सुरू आहे. तसेच क्वीनीनगर येथे भुयारी रस्त्याचे काम सुरू आहे. सदर बांधकामे वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण न होता, वेगाने व्हावीत यासाठी बिर्ला –वेर्णा चौक ते दाबोळी विमानतळ चौक दरम्यानच्या महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच बोगमाळो चौक ते वालिस चौक दरम्यानच्या उड्डाण पुलाच्या कामासाठी या महामार्गावरील वाहतूक जयरामनगरच्या अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यासंबंधी नोटीस काढण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरपासून हा निर्णय अंमलात येणार होता.
तथापी, जयरामनगरच्या रहिवाशांनी या निर्णयाला विरोध करून आपले निवेदन चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना दिले होते. याप्रकरणी दखल घेताना जयरामनगर येथील वाहतुकीसंबंधीची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
उपजिल्हाधिकारी करमली, मामलेदार प्रवीणजय पंडित, वाहतूक पोलिस निरीक्षक आविर्टो रॉड्रिग्ज तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी अंतर्गत रस्त्यांची पाहणी केली. याप्रसंगी जयरामनगरचे रहिवाशीही उपस्थित होते.
त्यांनी आपली बाजू मांडली. अंतर्गत रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली तर तेथे एकच गोंधळ होईल. त्याचप्रमाणे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अंतर्गत रस्त्याने वाहतूक वळविल्यास समस्या कमी होण्याऐवजी वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावरून महामार्गाची वाहतूक वळविण्यास आमचा विरोध असल्याचे त्या रहिवाशांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.