
पर्ये: सत्तरीतील वाळवंटी नदीचे पात्र दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहेत. तेथे अनेकांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मार्लेत वाळवंटी नदीत आंघोळीसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मोर्ले सरपंच अमित शिरोडकर यांनी ही माहिती दिली.
लवकरच नदीकाठी स्नानबंदीचे फलक लावले जाणार आहेत. या नदीची स्वच्छता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्थानिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिरोडकर यांनी केले. या डोहात पर्यटक आंघोळीसाठी येतात आणि काहीजण दारू पिऊन तेथे गोंधळ घालतात. अनेकांना पोहता येत नसल्यामुळे दुर्घटना घडतात.
डोहात आंघोळीवर बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. यासंदर्भात केरी आणि मोर्ले ग्रामपंचायती तसेच वाळपई मामलेदार व उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार वाळपई उपजिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश दिले आहेत.
मोर्ले आणि पेळावदा गावातील ग्रामस्थांनी मोर्ले गावातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या ‘उभो गुणो’, ‘मधले तळप’ आणि ‘करकार कोंड’ येथे किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा केला. प्लास्टिक, दारूच्या बाटल्या आणि अन्य कचरा हटवून नदीचा परिसर स्वच्छ केला. या अभियानात सुमारे ६० स्थानिकांनी तसेच पर्यावरण कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
गेल्या काही दिवसांपासून मोर्लेतील नदी काठच्या परिसरातील युवक वाळवंटीच्या उभो गुणो, मधले तळप आणि करकार या ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करत आहेत. या ठिकाणी अगोदरच काहीजण बुडून मरण पावले आहेत. तशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून येथे येणाऱ्यांना पर्यटकांना समजावून सांगून पुन्हा पाठवत आहेत. आज त्यांनी नदीकिनारी आंघोळबंदीचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे नदीच्या किनारी शांतता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.