

वाळपई: नगरपालिका क्षेत्रातील जीर्ण झालेले रस्ते, उखडलेले डांबरीकरण आणि खराब पदपथांमुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांवर अखेर दिलासा मिळणार आहे. गोवा राज्य शहरी विकास एजन्सी (जीसूडा) मार्फत सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपये खर्चून रस्ते दुरुस्ती व विकासकामे हाती घेण्यात येणार असून, या संदर्भातील निविदा नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वाळपई हे सत्तरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले रस्त्यांचे डांबरीकरण अनेक ठिकाणी खराब झाले असून, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
तसेच अनेक ठिकाणी डांबर उखडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या समस्यांची तीव्रता आणखी वाढते. पदपथांचीही दुरवस्था झाल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे कठीण झाले आहे.
याशिवाय, पूर्वी बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स अनेक ठिकाणी तुटलेले किंवा विस्कटलेले असल्याने नव्याने पुनर्बांधणीची गरज निर्माण झाली होती. नगरपालिका क्षेत्रातील काही प्रभाग ग्रामीण स्वरूपाचे असल्याने त्या भागांमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता अधिक जाणवत होती.
या सर्व बाबींचा सखोल विचार करून संबंधित प्रस्ताव तयार करण्यात आला आणि तो जीसूडाकडे पाठविण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने आता या कामांना गती मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.