Valpoi News : मंत्री राणे बनले गरीब कुटुंबांचा आधार; स्वखर्चाने बांधून देणार घरे

Valpoi News : २१ घरांची दुरुस्ती व बांधकामे सुरू
Valpoi
Valpoi Dainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, वादळी वारा व अवकाळी पावसाने अलीकडेच सत्तरीला दिलेल्या तडाख्यात अनेक घरांची पडझड झाली. काही घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरे भिंती कोसळून जमीनदोस्त झाली. अशा घरांच्या गरीब कुटुंबांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आधारस्तंभ बनले आहेत.

स्वखर्चाने अनेक घरे बांधून देण्यास त्यांनी प्रारंभ केला असून २१ घरांची दुरुस्ती व बांधकामे सुरू झाली आहेत.

सत्तरीच्या ग्रामीण भागात अनेक गरीब कुटुंबे वास्तव्यास आहेत. अनेकांना रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन चार पैसे कमवून पोट भरावे लागते. अशा स्थितीत वादळी वाऱ्याच्या तडाख्यात बेघर झालेल्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवलेले असताना त्यांच्या मदतीला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे धावून आले आहेत.

Valpoi
Goa's Three Controversy: शांतादुर्गा, कोकण रेल्वे, फार्मा नोकरभरती; आठवडा गाजवणाऱ्या गोव्यातील तीन घटना

त्यांनी स्वखर्चाने आवश्यकतेनुसार घर दुरुस्ती तसेच शक्य असलेल्या ठिकाणी नवीन घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबीयांनी मंत्री राणे यांचे आभार मानले आहेत.

सत्तरीतील वाळपई व पर्ये मतदारसंघातील अनेकांना वादळी वारा व अवकाळी पावसाची झळ बसली आहे. त्यात वाळपई, नागवे, सावर्डे, खोतोडा, पर्ये, उसगाव, पडोसे व इतर परिसराचा समावेश आहे.

मधलावाडा - पडोसे येथील विष्णू अनंत गावकर यांच्या घरावर २० रोजी वीज पडून घरातील वीज उपकरणे तसेच छप्पराचे मोठे नुकसान झाले होते. याची माहिती मंत्री राणे यांना मिळताच त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्यांचे घर दुरुस्त करून दिले. उसगाव येथे दोन नवीन घरे बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर खोतोडा येथे ३ घरे नवीन बांधून देण्यात येणार आहेत.

असोडे - सत्तरी येथे श्री सातेरी ब्राम्हणी केळबाय देवस्थानच्या सभागृहाचे पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान झाले आहे. सभागृहाचे छप्पर उडून गेले, तसेच मंदिराचा कलशसुध्दा वाऱ्याने खाली पडला आहे. मंदिराच्या शुभोभिकरणाचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे छप्पर बांधकामासह उडाले आहे. या मंदिराचे दुरुस्ती कामही मंत्री राणे यांनी हाती घेतले आहे.

बाराजण - सत्तरी येथे दोन च्यारी कुटुंबीयांची घरे अवकाळी पावसात जमीनदोस्त झाली. शरद च्यारी व किशोर च्यारी यांची ही मातीची जुनी घरे होती, ती कोसळल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले होते. या कोसळलेल्या घरांच्या जागेत नवीन घरे बांधून देण्यात येत आहेत.

किशोर च्यारी व त्यांची आई सुमती म्हणाली, आम्ही गरीब असून आमच्याकडे घर दुरुस्ती किंवा नवीन घर बांधण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, आमचे बाबा विश्वजीत राणे यांनी तातडीने आपली माणसे पाठवून आम्हाला नवीन घर बांधून देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

निराधार महिलेला मिळाला आधार

वेळुस - वाळपई येथील सत्यवती च्यारी या निराधार महिलेला राणे दांपत्याने घर बांधून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तातडीने काम सुरू केले असून काही दिवसांत घराचे काम पूर्ण होणार आहे.

सत्यवती च्यारी ही एकटीच घरात रहाते. तिला कोणाचाही आधार नाही. तिचे जुने घर मातीचे होते. पहिल्या पावसातच त्याचे छत कोसळले. याची माहिती मंत्री विश्वजीत राणे यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून जुन्या घराच्या बाजूला नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे.

सत्तरीतील अनेकांचे पावसाच्या तडाख्यात मोठे नुकसान झाले आहे. आवश्यकतेनुसार नवीन घरे बांधून देणे व दुरुस्ती कामे केली जात आहेत. नुकसानग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भर पावसात कोणीही बेघर होऊ नये, यासाठी आपण स्वखर्चाने मदत करत आहे.

- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com