'राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही', वाळपईत मराठी भाषाप्रेमींचे धरणे आंदोलन

Marathi language protest: "कोकणी भाषेला विरोध नाही, मात्र कोकणीसोबत मराठीला देखील राज्यभाषेचा दर्जा देण्यात यावा," अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
Marathi language movement
Marathi language movementDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: गेल्या काही वर्षांपासून गोव्यात कोकणी आणि मराठी भाषेच्या दर्जावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मंगळवारी (दि. २८) वाळपई, सत्तरी येथे काही मराठी भाषाप्रेमींनी एकत्र येत धरणे आंदोलन केले. "आमचा कोकणी भाषेला विरोध नाही, मात्र कोकणीसोबत मराठीला देखील राज्यभाषेचा दर्जा देण्यात यावा," अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

वाळपई येथील नगरपालिका व्यासपीठावर आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठी प्रेमी उपस्थित होते. आंदोलकांनी नोकर भरतीमध्ये मराठी विषय डावलल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आणि जोपर्यंत मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत मराठी प्रेमी गप्प बसणार नाहीत, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी 'मराठी संबंधी' जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विवेक जोशींकडून ऐतिहासिक दाखला

या धरणे आंदोलनात सत्तरीतील प्रसिद्ध कीर्तनकार विवेक जोशी यांनी सहभाग घेऊन आपली बाजू मांडली. त्यांनी पोर्तुगीजकालीन इतिहासाचा दाखला देत सांगितले की, पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांना ख्रिस्ती धर्म रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मराठी भाषेची आवश्यकता समजली होती आणि त्यांनी मराठीतून धर्मप्रचार करण्याचे प्रयत्न केले होते.

Marathi language movement
Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

जोशी यांनी खंत व्यक्त केली की, १९८७ मध्ये कोकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला आणि सरकारचा कायम पाठिंबा असूनही, कोकणीचे स्थान गोव्यात पूर्णपणे पक्के होत नाही. त्यांच्या मते, कोकणी भाषेतील वृत्तपत्रे म्हणावी तशी वाचली जात नाहीत आणि या भाषेतून म्हणावे तसे साहित्य निर्माण होत नाही. तरीही, कोकणीला आपला विरोध नसून, कोकणीसोबत मराठीलाही समान दर्जा मिळावा, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"मराठी ही केवळ भजन-कीर्तनाची भाषा नाही"

गोव्यातील प्रसिद्ध लेखिका डॉ. अनुजा जोशी यांनी देखील या आंदोलकांना संबोधित केले. आपला विचार पटवून देण्यासाठी सरकारला धरणे आंदोलन करावे लागणे, ही नामुष्कीची आणि दुर्भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. अनुजा जोशी यांनी सत्तरी भूमीचा उल्लेख पंडित महादेवशास्त्री जोशी, सुधाताई जोशी आणि दीपाजी राणे यांची भूमी आणि मराठीचा बालेकिल्ला असा केला. त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले, "मराठी ही केवळ भजन-कीर्तनाची भाषा नाही, मराठी हा श्वास आहे, ही आपली अस्मिता आहे. म्हणून ही भाषा जपली गेली पाहिजे."

जी भाषा पोर्तुगीज काळातही चिरतरुण राहिली, ती भाषा आज आपल्याच सरकारच्या काळात जपावी लागत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. सध्याच्या गटातटाच्या राजकारणात मराठीचा बळी जात आहे आणि संपूर्ण सत्तरी तालुका मराठीच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com