
वाळपई: वाळपई येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाच्या पालकांतर्फे प्रमुख सुबोध देसाई यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करून जमीन मालकी विषय सोडवावा, अशी मागणी केली आहे.
२००५ पासून नवोदय समितीतर्फे व गोवा सरकारतर्फे जमीन मालकीसाठी लढा सुरूच आहे. आता पालक सुबोध देसाई यांनीही न्यायालयात अर्जाव्दारे मालकी विषय सोडविण्यासाठी मागणी केली आहे. देसाई म्हणाले, या मालकीसंबंधी सुनावणी आता जानेवारीत १० रोजी होणार आहे. २००५ पासून जमीन मालकी विषय न्यायप्रविष्ट असल्याने शाळेचे कुंपणाचे काम करता येत नाही. याआधी उच्च न्यायालयात (High Court) २०१६ साली इमारतीची दुरुस्ती करण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका दाखल केल्यानंतर पालकांचा विजय झाला होता.
राज्य सरकारने केंद्र सरकारला वाळपई येथील मासोर्डे भागात सरकारने १,१७,९५० चौरस मीटर जागा दिली होती. पण हे विद्यालय बांधल्यानंतर वाळपईतील मारिया फिलोमिना पिन्हो व इतरांनी मिळून या जागेत आपला दावा करून म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. म्हापसा न्यायालयाने मारिया यांच्या बाजूंनी निकाल दिला होता. त्यावरून नवोदय समितीने, गोवा सरकारने (Government) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, असे देसाई म्हणाले.
या नवोदय विद्यालयाच्या बाजूलाच जंगल आहे. याआधी बिबट्याचे दर्शन झालेले आहे. सध्या कुंपण अनेक ठिकाणी मोडलेले आहे. त्यामुळे जंगली जनावरे विद्यालयाच्या आवारात येण्याची भीती वाढली आहे. येथे मुले-मुली, शिक्षक वास्तव्य करतात. ‘नवोदय’चे दुरुस्तीकाम झाले आहे. पण शाळेच्या सुरक्षिततेसाठी कुंपणाचे काम होणे आवश्यक आहे. जमीन मालकीचा प्रश्न सुटल्यानंतरच कुंपणाचे काम करता येणार आहे. सरकारने या विद्यालयाच्या जमीन मालकीविषयी गंभीर व्हावे. मालकी मिळत नसल्याने कुंपणाचे मात्र काम रखडलेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.