

वाळपई: देऊळवाडा–हिवरे येथील काजू बागायतीमधील सुक्या गवताला आग लागून एक झोपडी खाक झाल्याची घटना घडली. तसेच काजूच्या झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही बाग महादेव लक्ष्मण गावकर यांची आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुपारच्या तीव्र उन्हामुळे आगीने वेगाने पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
महादेव यांच्या बागेच्या बाजूला असलेल्या देऊ शिवा गावकर, तुकाराम देऊ गावकर आणि आप्पा देऊ गावकर यांच्या काजू बागायतींनाही आगीचा फटका बसला. सध्या काजूची झाडे चांगली बहरलेली असून काही दिवसांतच काजूचा हंगाम सुरू होणार होता.
मात्र, आगीत झाडे जळाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नैसर्गिक फायर बीटर्सच्या साहाय्याने अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
सुमारे तीन तासाच्या अथक परिश्रमाने आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या मदत कार्यात अग्निशमन दलाचे प्रमुख फायटर अरविंद एन. देसाई (एलएफएफ) यांच्या नेतृत्वाखाली एम. एस. गावडे (डॉप्ट), ए. जी. नार्वेकर (एफएफ), ए. यू. गावकर (एफएफ), आर. यू. गावकर (एफएफ) व ए. ए. शेटकर (एफएफ) यांनी सहभाग घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.