हा कसला न्याय..?
भाजपा एका घरात दोन तिकिटे देणार नाही म्हणून सांगतात आणि दुसऱ्या बाजूने राणे कुटुंबात दोन तर मोन्सेरात कुटुंबाला दोन तिकिटे देतात. एकाच घरात दोन उमेदवारी देणार नाही असे वारंवार सांगितल्याने मायकल लोबो मात्र पक्ष सोडून गेले. आता राहिल्या त्या सावित्री कवळेकर. त्यांना तिकीट देण्यासाठी एकाच घरात दोघांना नाही म्हणतात, मग त्या दोन कुटुंबांना एक न्याय आणि कवळेकर कुटुंबाला दुसरा न्याय? जसे लोबो पक्ष सोडून गेले, तसे बाबू कवळेकर गेले तर पक्षावर परिणाम होणार नाही याचे छातीठोकपणे कोणी नेता उत्तर देईल काय? की सावित्री यांना डावलण्यामागे मोठ्या नेत्यांमध्ये कसले रहस्य दडले असणार? कवळेकर दांपत्याचे वजन वाढणार म्हणून की आपल्या माणसाला दुखवू नये म्हणून हा सारा खटाटोप अशी चर्चा रंगू लागली आहे. ∙∙∙
आलेक्स सिक्वेराचा पत्ता कट?
माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी सुरवातीपासूनच यावेळी नुवे मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. सुरवातीला तेच एकमेव उमेदवार असतील असे वाटत होते, पण आता कॉंग्रेस उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यातच फ्रॅंकी डिमेलो नामक व्यक्तीने तो पोर्तुगालचा नागरिक असल्याचा आरोप केला आहे. आपल्याला कॉंग्रेस उमेदवारी मिळू नये म्हणून काही तिकीट इच्छुकांनी हा डाव रचला असे सिक्वेरा सांगतात. हे इच्छुक तर कॉंग्रेस पक्षातीलच तर नाहीत ना, असा संशय येऊ लागला आहे. ∙∙∙
सारस्वतांची मते कुणाला?
जेव्हापासून बाबू आजगावकर यांचे नाव मडगावसाठी भाजपकडून (BJP) व्यक्त करण्यात येत आहे, तेव्हापासूनच भाजपला पाठिंबा देणाऱ्या सारस्वतांची मते कुणाला? या प्रश्र्नावर मडगावातच नव्हे, तर सबंध गोवाभर चर्चेचा विषय ठरलेला आहे. जरी मडगावमधून सारस्वतच निवडून येत असला, तरी तो सर्वस्वी सारस्वतांच्याच मतावंरून हे कशावरुन? मते मिळविण्यापुरते सारस्वत एकदा निवडून आले की आपण सारस्वतांच्या मतावर नाही अशी भाषा बदल होतो, पण यावेळी सारस्वतांचीच मते निर्णायक ठरतील त्यासाठी खटाटोप एव्हानाच सुरू झाला आहे. यातून काही साध्य होईल का? ∙∙∙
(Use of government vehicle for goa assembly election campaign)
धर्मेश सगलानी यांचा धसका?
साखळी मतदारसंघातील काँग्रेस (Congress) उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला, तरी धर्मेश सगलानी यांचा धसका भाजपने घेतला असल्याचे दिसून येते. साखळीचे आमदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसे बिनधास्त आहेत. विरोधकांमध्ये एकजूट नसणार व काँग्रेस उमेदवार जाहीर झाल्यानंतर नेहमीप्रमाणे काँग्रेसमध्ये फूट पडणार अशी अपेक्षा बाळगून आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावलेला आहे. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. उमेदवार जाहीर झालेला नसला तरी काँग्रेसचा संयुक्त प्रचार जोरात सुरू आहे. भाजपचे सरकार असूनही सलग दोनवेळा काँग्रेसने मतदारसंघातील साखळी पालिका आपल्या ताब्यात ठेवून भाजप सरकारला नाकेनऊ आणले. भाजप सरकार असतानाही तब्बल दोनवेळा धर्मेशने आपल्या समर्थक गटाची साखळी पालिकेमध्ये सत्ता पटकावली. डॉ. सावंत मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करून सगलानी यांनी साखळीमध्ये आपले वर्चस्व सिध्द करून दाखवले. त्यामुळे भाजपने सगलानी यांचा बराच धसका घेतल्याचे जाणवत आहे. शिवाय न्यायालयातही सगलानी यांनी सरकार विरोधात विजय मिळवून साखळी पालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवली. सगलानीचे सरकार विरोधी हे यश पाहता काँग्रेस उमेदवार सगलानी असू नये अशी भाजपच्या गोटात चर्चा होत आहे. त्यांच्या अपेक्षेला यश मिळते की नाही हे लवकरच कळेल, पण सगलानी यांचा धसका भाजपने घेतलेला आहे हे मात्र नक्की. ∙∙∙
सरकारी वाहनाचा वापर प्रचाराला?
राज्यात निवडणूक (Goa Election) आचारसंहिता लागू झालेली असताना सरकारी वाहने मोठ्या दिमाखाने दिवस रात्र प्रचार कार्यासाठी वापरली जात आहेत. सत्ताधारी पक्षाने आपल्या मर्जीतील लोकांना, आमदारांना सरकारी महामंडळ देताना महागडी वाहने दिली होती, पण राज्यात निवडणूक जवळ आली असताना या वाहनांचा गैरवापर प्रचार कार्यासाठी केला जात असून हा दुरुपयोग अन्य पक्षाच्या लोकांनी केला असता, तर भाजपने रान पेटविले असते. सरकार असली वाहने प्रचार कार्यापासून रोखणार की सैरपणे प्रचार कार्याला संमती देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
भाजपमध्ये संधिसाधू?
साखळीतील भाजपमध्ये संधिसाधू घुसल्याचा आरोप जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांतर्फे होत आहे. साखळीत भाजप रुजविण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले, जेणेकरू आज भाजप सत्तास्थानी आहे, परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून खोगीर भरतीला भाजपमध्ये स्थान देण्यात येत आहे अशी भावना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बनली आहे. काँग्रेस सरकारचा सदैव लाभ घेतलेली मंडळीच आज भाजप सत्तेचा लाभ घेण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करून आपला लाभ घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते करताना आढळतात. भाजपमध्ये प्रवेश करून महिनाही झाला नाही अशा काँग्रेसजनांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या, तर काही भाजप निष्ठावंतांना सरकारी नोकरी मिळालीच नाही. त्यामुळे हे निष्ठावंत नाराज आहेत. साखळीत निष्ठावंतांऐवजी केवळ संधीसाधूंनाच स्थान? असा प्रश्न निष्ठावंत भाजप कार्यकर्त्ते करत आहेत. ∙∙∙
डुबती नैया!
तीन महिन्यांपूर्वी गोव्यात प्रवेश करून जणू संपूर्ण गोवाच काबीज केला या थाटात वावरणाऱ्या तृणमूलवर सध्या ‘कुणी युती करता का हो युती’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. उलट काही महिन्यांपूर्वी अगदी कोमात गेलेल्या काँग्रेसला गोव्यात अचानक अच्छे दिन आले आहेत असे वाटते. तृणमूलमध्ये सुरवातीला काही लोक सामील झाले होते, तेव्हा त्यांना प्रशांत किशोर यांची आय पॅक आपल्यासमोर आयते जेवण तयार करून ठेवणार असे वाटले होते, पण आतापर्यंत प्रशांत किशोर यांनाही ‘अजीब है गोवा के लोग’ याची प्रचिती आली असावी. त्यामुळे आता सोशल मीडियावरही तृणमूलची लोक खिल्ली उड२वू लागले आहेत. तृणमूलची सध्या गोव्यात काय स्थिती झाली आहे याची झलक म्हणून या पोस्टरकडे पाहता येत नाही का? ∙∙∙
आयएसएल संकटात
कोविड महामारीच्या कालखंडात 2020-21 मध्ये गोव्यात जैव सुरक्षा वातावरणात आयएसएल फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले, त्यामुळे आयोजकांचा हुरूप वाढला. 2021-22 मधील स्पर्धेसाठीही गोव्यालाच प्राधान्य मिळाले. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सामने सुरळीतपणे झाले. मात्र, जानेवारीत महामारीच्या तिसऱ्या लाटेला ऊत आल्यानंतर आता कोविडने आयएसएल स्पर्धेलाही ग्रासले. त्यामुळे दोन सामने लांबणीवर टाकण्यात आले. स्पर्धेतील किमान पाच संघांत कोरोना विषाणूने शिरकाव केल्याचे सांगतात. त्यामुळे आता स्पर्धा आयोजकांचे धाबे दणाणले आहेत. बाधित संघांचे सामने लांबणीवर टाकायचे, की स्पर्धा स्थगित करायची या द्विधा मनःस्थितीत आयोजक आहेत. स्पर्धा थांबली, तर सारे गणित बिघडणार हे निश्चित. ∙∙∙
फोंड्याचा विकास
रवी पात्रांव व फोंडा असेच समीकरण गेली काही वर्षें तरी तयार झाले होते. अपवाद होता तो लवू मामलेदार यांची मधली पाच वर्षे. फोंड्याच्या आज झालेल्या विकासाचे सारे श्रेय त्यामुळे पात्रांवानाच दिले जाते, पण आता तेथे काँग्रेस उमेदवार असलेल्या राजेश वेरेकरांना ते मान्य नाही. रवीबाबांचे सर्व दोष मान्य केले तरी त्यांनी विकासाकडे तडजोड केलेली नाही हे खरेच. त्याहून महत्वाचे म्हणजे ते काँग्रेस आमदार असताना हा विकास झालेला आहे, पण काँग्रेसलाच ते मान्य नाही! ∙∙∙
रुमडामळचा असाही आदर्श
नावेली मतदारसंघात मोडत असलेल्या या पंचायतीत नुकताच भाजप समर्थक पंच सरपंचपदी आरुढ झाला आहे. त्रूणमूल खासदार लुईझिन यांचे या पंचायतीवर वर्चस्व होते. आताचे माहीत नाही, पण तेथे सर्व पक्ष, धर्म, जाती यांनी एकत्र येऊन सलोख्याने पंचायत चालविली. गत निवडणुकीनंतर तेथे एकही अविश्वास ठराव आला नाही. कारण सर्व सात पंचांनी पाच वर्षे सरपंच व उपसरपंचपद आपसात वाटून घेतले. आपसातील समझोत्याचा हा शेवटचा टप्पा आहे. ∙∙∙
दोन तासांचा ‘आयकॉन’
राजकारण्यांच्या जवळ असले म्हणजे फायदा होतोच असे काहींना वाटत असावे, पण फातोर्ड्यातील युवा कलाकार निलय नाईक याला वेगळाच अनुभव आला आहे. निलय हा दामू नाईक यांचा कार्यकर्ता. दामूच्या प्रचाराचे काही व्हिडीओही त्याने तयार केले आहेत. याच निलयची निवडणूक आयोगाने, म्हणजेच आयोगासाठी काम करणाऱ्या एका स्थानिक मामलेदाराने (कदाचित वशिल्यानेही असावे) लोकांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा आयकॉन म्हणून नेमणूक केली होती. मात्र, त्याने दामूसाठी व्हिडीओ केल्याचे आयोगाच्या लक्षात आल्यावर अवघ्या दोन तासांत हा आदेश मागे घेत निलयची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. म्हणतात ना राजकारण्याशी जास्त दोस्ती असल्यास ती महागातही पडू शकते.∙∙∙
भाजप उमेदवारीला उशीर का?
सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने भाजप उमेदवारी जाहीर करताना पक्षाने केलेल्या सर्व्हेचा वापर करत अनेक काळजी घेत आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सध्या अनेकजण प्रयत्नशील आहेत. याशिवाय बाहेरून अनेक जणांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची सोमवारी जाहीर होणारी यादी नेमकी कधी जाहीर होणार यावरून उमेदवारी जाहीर होण्याबाबत भाजपसमोर निर्माण झालेले पेच आहेत हे आता स्पष्ट आहे. सुमारे 11 मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक आणि उमेदवारी दिल्यानंतर इतर उमेदवार अन्य पक्षांचा आसरा घेतील या कारणास्तव भाजपला सध्या तरी आपली उमेदवार यादी जाहीर करण्याला उशीर लागतोय हे स्पष्ट आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.