Maik Hanky Visits Saint Francis Xavier Exposition Goa
पणजी: भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. गतवर्षी तीन लाखांवर भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिकण्यासाठी गेले आहेत. अमेरिकेत नव्या प्रशासनाच्या अधिपत्याखाली अमेरिका - भारताचे संबंध कायम दृढ राहतील, त्याचबरोबर गोव्यात झालेल्या विकास व पायाभूत सुविधांचा उल्लेख करीत अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माईक हॅन्की यांनी दिव्यांगांसाठी गोवा सरकारने केलेल्या कामाचे कौतुक केले.
सेंट फ्रान्सिस झेव्हियर शवप्रदर्शन सोहळ्यास गोव्यात उपस्थिती लावणारे हॅन्की यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. सध्या भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल झालेल्या कथित गुन्ह्याविषयी देशात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, संबंधित प्रत्येक गोष्टीवर यूएस एसईसी (सुरक्षा आणि विनिमय आयोग) आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांनी एक सविस्तर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यात त्याविषयी संदर्भ दिलेले आहेत, असे सांगत हॅन्की यांनी याविषयावर अधिक बोलण्याचे टाळले.
हॅन्की म्हणाले, ‘इफ्फी’मध्ये अमेरिकेतील चित्रपट निर्माते दाखल झाले आहेत. इफ्फीमुळे दोन्ही देशातील चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांमध्ये सहकार्य वाढीस लागेल. त्याशिवाय गोव्यात विकासाबरोबर संस्कृती टिकलेली आहे. याठिकाणी गोव्यात आपले येणे-जाणे होत असते, त्यामुळे येथील झालेला विकास सहज लक्षात येतो.
फार्मसी उद्योगात बरेच काही करण्यासारखे आहे, येथे विशेष म्हणजे संशोधन आणि परस्पर सहकार्याची अपेक्षा वाढीस लागेल. आम्ही अनुभवातून शिकू शकतो आणि जगभरातील इतर अनुभवांमधून गोवावासी शिकू शकतात. गोवा सरकारने दिव्यांगांसाठी केलेल्या कामाचा व उपक्रमांचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
भारतासोबतच्या संबंधांबद्दल हॅन्की म्हणाले की, सन २००८ पासून अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तंत्रज्ञान सहकार्यांची संख्या वाढली आहे आणि संस्थांसोबत शैक्षणिक भागीदारी वाढली आहे. अमेरिकन व्हिसाचा प्रश्न नव्या सरकारच्या काळात सुटेल. गेल्या दोन दशकांमध्ये प्रशासनामध्ये जॉर्ज बुश, बराक ओबामा, ट्रम्प (त्यांच्या पहिल्या कार्यकाळात) किंवा जो बायडन यांच्या काळात दोन्ही देशांमध्ये संबंध वाढवण्याचा ट्रेंड आहे आणि तो कायम राहील.
अमेरिकेत स्थापन होणाऱ्या ट्रम्प यांच्या सरकारकडून दोन्ही देशातील हितसंबंध कायम राहतील, असे आपणास वाटते. विशिष्ट धोरणे आणि प्रशासनाच्या बाबतीत सतत वाढ दिसून येईल. ट्रम्प हे सक्रिय आणि आक्रमक नेते असून त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ पूर्णपणे सशक्त आहे, असे हॅन्की म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.