Goa University Elections Result: 15 वर्षांनंतर गोवा विद्यापीठात परिवर्तन, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आघाडीचा ऐतिहासिक विजय; 2027 च्या सत्तापालटाची नांदी?

Goa University Elections Result: गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत यंदा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला.
United student
United studentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत यंदा मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी' (GFP) यांच्या युतीने या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा या आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून हा निकाल राज्याच्या आगामी राजकारणावरही प्रभाव टाकू शकतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

विजयाचे श्रेय एकता आणि परिश्रमाला

या ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, हा केवळ एका निवडणुकीचा निकाल नसून विद्यार्थ्यांच्या सामूहिक शक्तीचा विजय आहे. गेल्या 15 वर्षांतील ही सर्वात महत्त्वाची घडामोड आहे. विद्यार्थ्यांनी प्रगतशील दृष्टिकोन आणि लोकशाही मूल्यांवर आपला विश्वास व्यक्त केला. सरदेसाई यांनी पुढे असेही नमूद केले की, "एकता, सातत्यपूर्ण परिश्रम आणि विद्यार्थ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले. शेवटी लोकशाहीचा विजय झाला."

तरुणांचा कौल प्रगतशील विचारधारेला

गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या राजकारणात दुसऱ्या गटांचे वर्चस्व होते, मात्र यंदा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने समन्वयाने काम करत विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडली. या विजयामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हा विजय म्हणजे आगामी काळात तरुणांना सोबत घेऊन जाण्याचे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. समावेशक प्रतिनिधित्व आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विधायक काम करण्याच्या आश्वासनाला तरुणांनी भरघोस पाठिंबा दिल्याचे या निकालावरुन स्पष्ट होत आहे.

विद्यापीठ परिसरात जल्लोषाचे वातावरण

निकाल जाहीर होताच गोवा विद्यापीठाच्या परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करत हा विजय साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मते, गेल्या 15 वर्षांपासून असलेल्या एकाधिकारशाहीला छेद देण्यासाठी हे परिवर्तन गरजेचे होते. या निकालानंतर आता विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यापीठातील शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवी आघाडी जोमाने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हुकूमशाही आणि राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध कौल

गेल्या काही काळापासून शैक्षणिक संस्थांमधील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. पणजीकर यांनी नमूद केले की, हा निकाल केवळ एका निवडणुकीचा विजय नसून तो भाजप सरकारच्या दडपशाहीविरुद्धचा मोठा कौल आहे. "विद्यापीठात विद्यार्थ्यांनी दाखवलेली हीच एकजूट 2027 मध्ये गोव्यातील भाजप सरकारच्या अंतची सुरुवात ठरणार आहे," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com