Ganesha Temple: चोहोबाजूंनी कुळागारांनी वेढलेला तळ्यातला गणेश

मंदिर व परिसरातील निसर्ग, कुळागर यांची व्यवस्था पाहता, अतिशय विचारपूर्वक, भविष्याचा विचार करून ही निर्मिती केल्याचे लक्षात येते.
Unique Ganesha Temple in Goa
Unique Ganesha Temple in GoaDainik Gomantak

जयश्री देसाई

Unique Ganesha Temple in Goa: हिरव्यागार निसर्गाचे वरदान लेवून, चारी बाजूला कुळागारांचे कुंपण वेढून डोंगराच्या मध्ये वसलेले सत्तरी तालुक्यातील वांते गावामधील जोशी कुटुंबाचे ''तळ्यातला गणपती मंदिर'' म्हणजे गणेश मंदिरांपैकी एक जुने आणि सुंदर मंदिर म्हणायला हरकत नाही.

मंदिर व परिसरातील निसर्ग, कुळागर यांची व्यवस्था पाहता, अतिशय विचारपूर्वक, भविष्याचा विचार करून ही निर्मिती केल्याचे लक्षात येते.

Unique Ganesha Temple in Goa
Goa Monsoon Update: पणजीत 36 तासांत 6 इंच पाऊस! ऐन चतुर्थीत गणेशभक्तांची तारांबळ...

शालीवाहन शके १७०० च्या काळात म्हणजे इ. स. १७७६ मध्ये कोकणातील दापोलीहून रघुनाथ जोशी हे सत्तरीच्या या डोंगराळ परिसरात आले.

रघुनाथ जोशी यांना जोशी कुटुंबाचे मूळपुरुष म्हटले जाते. या परिसरात त्यांनी बिऱ्हाड थाटले. सुरुवातीला त्यांनी एका दगडात सप्तर्षी आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती कोरली.

काही काळाने याच ठिकाणी एका मोठ्या पाषाणात त्यांनी एका बाजूला गणपती व दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती कोरली. या पाषाणाखाली एक झरा वाहतो. या झऱ्यातील पाणी मंदिरासमोरील तळ्यात पडते.

या पाण्याचे व्यवस्थापन पूर्वीपासून नेटक्या पद्धतीने केले आहे. त्याचा उपयोग परिसरातील नागरिक आणि झाडांना होतो. त्यामुळे वर्षभर हा परिसर हिरवागार, थंड राहतो.

३०० वर्षांहून अधिक जुने असणारे हे मंदिर फार कमी लोकांना माहीत आहे. मंदिरात जोशी कुटुंबाच्या मूळपुरुषाची व त्यांचे कुलदैवत व्याघ्रेश्वर यांचीही मूर्ती आहे. हे कुटुंबीय आजही या तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात.

येथे दरवर्षी दत्त जयंती व त्रिपुरोत्सव (कार्तिक पौर्णिमा) साजरे होतात. तळ्याच्या मध्ये केळीचा खांब रोवून त्याला पोफळीच्या कांबीच्या पट्ट्या जोडल्या जातात. त्यावर लावलेल्या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघतो.

पूजेचा मान दरवर्षी एका कुटुंबाकडे, अशा प्रकारे तीन कुटुंबांमध्ये तो फिरत राहतो. सध्या रघुनाथ जोशींच्या वंशजांपैकी प्रमोद जोशी आणि त्यांची दोन मुले ओंकार आणि अवधूत जोशी हे याठिकाणी वास्तव्यास आहेत.

इतर सर्वजण नोकरी-व्यवसायासाठी गोवा व महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत. पूर्वी सर्व कुटुंबांचा मिळून एकच मोठा वाडा होता. मध्यंतरी हा वाडा जळला. आता तेथे जोशी यांचे घर आहे. मंदिराच्या बाजूला त्यांच्याच भावंडांपैकी एका जोशींचे घर आहे. ते साखळीत असतात. सण-समारंभाला ते घरी येतात.

गावातील इतर लोकही दर्शनासाठी मंदिरात येतात. मात्र, फार माहिती नसल्याने मंदिर परिसरातील शांतता व निसर्ग अद्यापही टिकून आहे. वर्षानुवर्षांची नारळ, सुपारी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुला-फळांची झाडे येथे आहेत.

१५० वर्षे जुने एक नारळाचे झाड अगदी दिमाखात उभे आहे. मी लहान असल्यापासून ही झाडे अशीच आहेत, असे म्हणत प्रमोद जोशी या झाडांचे वयसुद्धा सांगतात.

जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना

मंदिराच्या तळ्यात तीन कुंडांमधून पाणी पडते. या तीन कुंडांमधून पाणी पिण्यासाठी, अंघोळीसाठी तसेच इतर वापरासाठी वापरले जात असे. या सर्व कुंडांमधील पाणी तळ्यात पडते. हे पाणी निर्जंतुक राहावे, यासाठी तळ्यात मासे सोडले आहेत.

हे मासे तळ्यातील हानिकारक सूक्ष्मजीव खाऊन टाकतात. तळ्यातील पाणी गढूळ होऊ, यासाठी तळाला चिरे बसविले आहेत. परिसरातील कुळागारांना पाणी जावे, यासाठी तळ्याच्या एका बाजूने जागा सोडली आहे. तेथून हे पाणी कुळागारातील नारळ-सुपारीच्या झाडांना जाते.

गायत्री मंत्राची अनुभूती

संध्याकाळच्या वेळी मंदिरात शांत बसले असता गायत्री मंत्र कानावर पडतो. रामचंद्र जोशी तिथे बसून गायत्री मंत्राचा जप करत असत. आजही त्याची अनुभूती येते.

एखाद्या तल्लख बुद्धीच्या माणसाने भविष्याचा विचार करून निर्मिलेले हे मंदिर आणि परिसर म्हणजे शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रमोद जोशी म्हणाले.

दत्त पादुकांची स्थापना : रघुनाथ यांचे वंशज यशवंत विनायक जोशी यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांचे कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हते. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीने श्री दत्ताची उपासना करण्याचा सल्ला दिला.

यशवंत यांनी म्हणूनच गणेश मंदिराच्या वरच्या भागात एक पर्णकुटी उभारून त्यात दत्त पादुकांची स्थापना केली आणि दत्त उपासनाही सुरू केली, असे वंशज प्रमोद जोशी सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com