Goa Monsoon Update 2023: गणेश चतुर्थीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्याच्या अनेकांच्या नियोजनावर पावसाने पाणी टाकले.
ढगांचा गडगडाट आणि चमकणाऱ्या विजांसह जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने शिवाय लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील केले. राजधानी पणजीत गेल्या ३६ तासांत तब्बल ६ इंच पावसाची नोंद झाली.
नेहमीप्रमाणे सूर्यदर्शन आज झाले नाही. नभावर काळ्या मेघांनी आक्रमण केले होते. सकाळी रिपरिप सुरू केलेल्या पावसाने तास दीड तासातच जोर पकडला. यामुळे भर दिवसा अंधारल्यागत झाले होते. पावसासोबत सोसाट्याचा वाराही वाहत असल्याने पावसाचा जोर वाढल्यागत वाटत होता.
काल रात्रभर अधून मधून हजेरी लावणाऱ्या पावसाने आजचा दिवस पावसाचा आहे, यावर सकाळीच शिक्कामोर्तब केले. हवामान खात्याचा तुरळक सरींचा अंदाजही फोल ठरवला.
आरतीसाठी घुमट उन्हात शेकवण्याचा बेत केलेल्यांना तो रहित करावा लागला. पावसामुळे उत्साही गणेशभक्तांना फटाकेही फोडता आले नाहीत.
पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. गेल्या तीन-चार दिवसांत भर दुपारी वाढलेल्या आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहत असत. मात्र, आज तो उकाडा कुठच्या कुठे पळाला होता. पावसाने तापमानाचा पाराही खाली आणल्यागत भासत होते.
शहरातील रस्ते तर पाण्याखाली गेलेच, याशिवाय अनेक सखल भागांत जलभराव झाल्याचे दिसून आले. चारचाकी वाहन चालकांनाही दृश्यमानता कमी झाल्याने वाहने सावकाश हाकावी लागत होती. गेले आठवडाभर पाऊस येत-जात आहे.
त्यामुळे काही वेळाने पाऊस थांबेल याच्या प्रतीक्षेत असलेल्यांना रेनकोट घालून दुचाकीने किंवा चारचाकीने कामाचे ठिकाण गाठण्याशिवाय आज पर्याय राहिला नव्हता.
राज्यात गणेशोत्सवादरम्यान तुरळक सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात दमदार पाऊस पडल्याने हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. पणजीसह राज्यभरातील नागरिकांची धांदल उडाली.
गोव्यासह कर्नाटकच्या किनारी भाग, केरळच्या काही भागांत भागात पाऊस सक्रिय आहे. शिवाय, दक्षिण गुजरातमध्ये चक्रीवादळाची स्थिती अजूनही कायम आहे.
मागील ३६ तासांत सर्वाधिक १५२ मि.मी (६ इंच) पाऊस राजधानी पणजीत पडला आहे. गुरुवारी सकाळी ८.३० ते ५.३० दरम्यान एकूण ७५.६ म्हणजे ३ इंच पावसाची नोंद करण्यात आली. मागील २४ तासांत मुरगाव ६६ मि.मी., साखळी ६४ मि.मी, फोंडा ५० मि.मी., म्हापसा ४० मि.मी., पेडणे ३० मि.मी., काणकोण २० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
सरकारी कार्यालयांत आज नगण्यच उपस्थिती होती. पावसामुळे सरकारी कार्यालयांत एरव्ही कामासाठी ये जा करणारे आज फिरकलेच नाहीत. त्यामुळे तालुका पातळीवरील सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असूनही लोकांचा खोळंबा झाला, असे दिसून आले नाही. जोरदार पडलेल्या पावसामुळे ऐन सप्टेंबरमध्ये आषाढातील पर्जन्यसरींचा अनुभव आला.
रविवारनंतर यलो अलर्ट : हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवार, शनिवारी पाऊस ओसरणार असून रविवार व सोमवारी (२४, २५ सप्टेंबर) पुन्हा दमदार पाऊस पडणार आहे. या काळात यलो अलर्ट जारी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.