Road Issues: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत सध्या स्मार्ट रस्ता आणि भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी सांतिनेजमधील रस्ता निर्मितीसाठी असणारी अतिक्रमणे हटविण्यात होत असलेली दिरंगाई कामाचा अवधी वाढवित आहे.
रस्ता तयार होऊन तो वाहतुकीसाठी खुला होण्याला किमान फेब्रुवारी संपण्याची म्हणजेच मार्च उजाडण्याची शक्यता दिसते. या विलंबालाही कंत्राटदारांच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला आहे.
‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी पंधरा दिवसांपूर्वी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स यांना घेऊन येथील कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी ही कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होतील असे वाटत होते, परंतु जसजशी कामे पुढे जात आहेत, तसतशी आणखी कामे वाढत आहेत, असे दिसते.
अतिक्रमणाचा अडसर; पुढे काम सुरू राहणार का?
या रस्त्याच्या बाजूला असणारी झाडी आणि संरक्षक भिंत व इतर काही अतिक्रमणे हटवावी लागणार असल्याचे रस्त्याच्या कामावरून दिसते. सात मीटर रस्ता आणि दोन्ही बाजूला पदपथ व तसेच काही ठिकाणी वाहन पार्किंग सुविधा ठेवावी लागणार आहे.
जिथपर्यंत रस्त्यासाठी खडी टाकली आहे, त्यापुढे काही अतिक्रमणे आहेत. ती हटवावीत म्हणून महापालिकेशी आयपीएससीडीएलने पत्रव्यवहार केला आहे. अतिक्रमणे हटविली जाणार नाहीत. तोवर रस्ता काम अर्धवट राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे.
‘स्मार्ट सिटी’ मिशन हरित पणजीसाठी वचनबद्ध !
1 स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत हरित पणजीसाठी आयपीएससीडीएल वचनबद्ध आहे . पणजीत टप्प्याटप्प्याने मोठ्या आणि पद्धतशीरपणे नियोजित नैसर्गिक हिरवे आच्छादन आकार घेता येईल. गटार व रस्त्याच्या कामावर परिणाम होत असल्याने दोन झाडे हटवावी लागली होती.
2 री-ग्रीनिंग योजनेनुसार संपूर्ण विकास प्रक्रियेत तिचे पालन केले जात आहे. मधुबन कॉम्प्लेक्स ते शीतल हॉटेल, सांतीनेज पट्ट्यापर्यंतच्या जिथे काम पूर्णत्वाकडे आहे, तेथे ‘आयपीएससीडीएल’ने जवळपास ३० झाडांच्या लागवडीसाठी जागा निश्चित केली आहे.
3 ही झाडे पुरेशा अंतराने दोन्ही बाजूंना धोरणात्मक पद्धतीने लावली जाणार आहेत. पणजीचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि हिरवे आच्छादन वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे. या हरित उपक्रमाद्वारे शहरात सकारात्मक परिवर्तनाची अपेक्षा आहे.
4 पूर्ण झालेल्या मिनेझिस ब्रागांझा रोड आणि मध्य पणजीतील डॉ. पी. शिरगावकर मार्गाच्या बाजूने झाडांनी झाडे लावण्यात आली आहेत. शहर हिरवेगार करण्याच्या प्रयत्नांची ही बांधिलकी आहे.
मुख्य सचिव लवकरच करणार पाहणी! : ‘आयपीएससीडीएल’चे चेअरमनपद राज्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोएल यांच्याकडे असल्याने येत्या काही दिवसांत ते स्वतः उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना, तसेच स्मार्ट सिटी मिशनशी निगडित विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना, महानगरपालिका अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना घेऊन पाहणी करणार असल्याची माहिती हाती आली आहे. सांतिनेजमधील काम रखडले आणि अतिक्रमणाचा विषय प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यास ते काय पावले उचलतात, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.