Goa Mankurad Mango: 'मानकुराद'चा गोडवा महागच! आंब्यांचे दर आवाक्याबाहेर, असंतुलित हवामानाचा फटका

Goa Mango Rates: बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीला ६ हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जाणारा मानकुराद आता १५०० ते २ हजार रुपये दराने विकला जात आहे.
 Mankurad mangoes in Goa
Mankurad mangoes Goa PriceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीला ६ हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जाणारा मानकुराद आंबा आता १५०० ते २ हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे. त्यामुळे काही मध्यमवर्गीय नागरिक ज्यांना या दरात आंबा घेणे परवडते ते अर्धा ते डझनभर आंबे खरेदी करत आहेत.

पणजी बाजारात महाराष्ट्र तसेच कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात हापूस, केसरी, सेंदुरी, मल्लिका आदी आंबे दाखल झाले असून या आंब्यांनाही चांगली मागणी असून बाजारात इतर फळांच्या तुलनेत आंब्याचीच आवक अधिक आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा मारादेखील वाढला आहे, त्यामुळे अनेक आंबा उत्पादकांनी पिकाची नासधूस होऊ नये यासाठी पिकायला आलेले आंबे उतरवून घेतले आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभरात हे आंबे बाजारात दाखल होतील व येत्या आठवड्यात आंब्याच्या दरात अजून काही प्रमाणात घट होण्याची शक्यता विक्रेते व्यक्त करत आहेत.

डिचोलीत ‘मानकुराद’चे दर परवडण्यापलीकडे

गेल्या आठवड्यापासून ‘मानकुराद’चे डिचोली बाजारात दर्शन होत असले, त्याचे प्रमाण एकदम कमी आहे. अजूनतरी बाजारात आंब्यांचा घमघमाट सुटलेला नाही. परिणामी ‘मानकुराद’चा भाव वाढला असून, सध्या सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. असंतुलित हवामानामुळे यंदा आंबा पिकावर परिणाम झाल्याने यंदा सामान्य ग्राहकांना ‘मानकुराद’ची चव चाखायला मिळते की नाही, त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘मानकुराद’ स्वस्त कधी होणार आणि आंब्यांची गोडी कधी चाखायला मिळणार, त्याची सामान्य खवय्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, यंदा शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेवेळी ‘मानकुराद’चा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

चावडी बाजारात हापूस ७०० रु. डझन

आंबा पिकतो रस गळतो, असे म्हणतात. मात्र, हा आंब्याचा रस काणकोणात महाग झाला आहे. काणकोण बाजारात बाहेर गावाहून आलेले आंबे दाखल झाले आहेत. मात्र, या आंब्यांचा दर सामन्यांच्या खिशाला परवडणारा नाही. चावडी बाजारात हापूस आंबा ७०० रुपये डझन तर मानकुराद आंबा १२०० रुपये डझन या भावात विकला जातो. अन्य जातीचे आंबे २०० ते ३०० रुपये किलो दराने विकण्यात येतात त्यामुळे सामान्य ग्राहक हापूस, मानकुराद यांचा आस्वाद घेण्याऐवजी अन्य आंब्यांची खरेदी करत आहेत.

पेडणेत बदलत्या हवामानाचा आंबा व्यावसायिकांना फटका

काजू उत्पादनाप्रमाणेच बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबा उत्पादनालाही बसला आहे. आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली व मोहर येण्याच्या प्रमाणावरही त्याचा अनिष्ट परिणाम झाला. मोहर आल्यानंतर फलधरणेसाठी उष्णतेचे आवश्यकता असते; पण मध्येच थंडी, मध्येच उष्णता तर मध्येच काही दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडले, अशा या बदलत्या हवामानाचा फटका आंब्याच्या उत्पन्नावर झाला आहे.

दरम्यान, पेडणे तालुक्यात मानकुरादचा दर एक डझन आंब्यांसाठी १५०० रुपये तर एक डझन हापूस आंब्यासाठी ८०० रुपये असा आहे. आंबा बागायतदार व आंबा व्यवसायिकांना जसा यंदा मोठा फटका बसणार आहे, त्याचप्रमाणे खवय्यांनाही आंबा खरेदी करणे परवडणारे नसणार हे निश्चित.

उत्पादनात घट झाल्यामुळे सत्तरीतील शेतकरी चिंतेत

सत्तरीतील ७० टक्के शेती ही काजू पिकाने व्यापलेली आहे. त्याचबरोबर नारळ, सुपारी, केळी बागायती, आंब्याबरोबर इतर पिकेही येथे घेतली जातात. मात्र, यंदा वातावरण बदलाचा परिणाम या पिकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तरीतील शेतकरी चिंतेत आहेत. यंदा आंब्याचे पीकही कमी असून बाजारात आवकही कमी असणार आहे, असे नगरगाव येथील शेतकरी धनंजय मराठे यांनी सांगितले.

 Mankurad mangoes in Goa
Goa Mango Rates: आंब्याची आवक वाढली! बाजारात विक्रेत्यांची गर्दी, काय आहेत दर? जाणून घ्या..

म्हापशात आवक कमी झाल्याने चढे दर कायम

म्हापसा बाजारपेठेतील आंबा विक्रेत्या महिलेने सांगितले की, अद्याप आंब्यांची आवक जास्त नाही. जे आंबे उपलब्ध आहेत, त्यानुसारच भाव ठरविला जात आहे. सध्या मी दीड हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत मानकुराद आंबे विकत आहे. अपेक्षित असे गिऱ्हाईक नाही; कारण हे दर सर्वांनाच परवडत नाहीत. किमान अजून महिनाभर तरी आंब्याचे दर हे चढेच राहणार आहेत. जसजशी बाजारात आंब्यांची आवक वाढेल, तशी दरात घसरण होईल. सध्या एप्रिलमध्ये तर हा दर दीड ते दोन हजार रुपयांपर्यंतच राहिल असे दिसते. काही दिवसांपर्यंत हेच आंबे हजार रुपयांना केवळ तीन नगच दिले जात होते.

 Mankurad mangoes in Goa
Goa Mango Rates: आंब्याची आवक वाढली! बाजारात विक्रेत्यांची गर्दी, काय आहेत दर? जाणून घ्या..

शंभर रुपयांना ७ कैऱ्या

या पिकलेल्या आंब्यासहित लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या, लहान घोटा (पिकलेले लहान आंबे), इतर विविधांगी स्थानिक आंबे बाजारात दाखल झाले आहेत. मध्यम आकारच्या कैऱ्या शंभर रुपयांना ५ ते ७ या अशा विकल्या जात आहेत. गोव्यात पिकवलेला हापूस आंबा हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे. तर मल्लिका आंबादेखील हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com